मुंबई – अहमदाबाददरम्यान ५०८ किमी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे तीन मोठे रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार आहेत. जपानमधील शिंकनसेन डेपोच्या धर्तीवर या डेपोची रचना केली जाणार आहे. तीनपैकी एक रोलिंग स्टॉक डेपो ठाण्यात, तर उर्वरित दोन गुजरातमधील साबरमती आणि सुरत येथे उभारण्यात येणार आहेत. तेथे बुलेट ट्रेनची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तिन्ही रोलिंग स्टॉक डेपोचे आरेखन आणि बांधकामासाठी स्वीकृतीचे पत्र जारी करण्यात आले आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून (एनएचएसआरसीएल) देण्यात आली.
हेही वाचा >>> मेट्रो २ अ मार्गिकेवरील एक्सर – मंडपेश्वरदरम्यान काही वेळ वाहतूक ठप्प
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील १०० टक्के भूसंपादन झाले. तर, आता विविध पायाभूत कामे करण्यासाठी स्वीकृतीचे पत्र जारी करण्यात येत आहेत. सुमारे ५५ हेक्टर क्षेत्रात ठाणे डेपो उभारण्यात येणार आहे. त्यात बुलेट ट्रेनची देखभाल केली जाईल. सुरुवातीला ४ तपासणी मार्गिका आणि १० उपमार्गिका (स्टेबलिंग) बांधण्यात येणार आहेत. भविष्यात त्या अनुक्रमे ८ आणि ३१ पर्यंत वाढविण्यात येणार आहेत. ठाणे रोलिंग स्टॉक डेपोचे आरेखन आणि बांधकामसाठी स्वीकृती पत्र मेसर्स दिनेशचंद्र- डीएमआरसी जेव्ही यांना जारी केले आहे. यात पायाभूत कामे, तपासणी शेड, देखभाल – दुरुस्ती डेपो यांचा समावेश आहे. तसेच ४० प्रकारच्या विविध यंत्रणा जपानकडून खरेदी केल्या जाणार आहेत.
सर्वाधिक मोठा रोलिंग स्टॉक डेपो साबरमती येथे उभारण्यात येणार असून सुमारे ८३ हेक्टर क्षेत्रफळावर ते उभारण्यात येणार आहे. तेथे वाॅशिंग प्लांट, वर्कशॉप, शेड असतील. या डेपोत १० उपमार्गिका नियोजित असून भविष्यात २९ उपमार्गिका वाढवल्या जातील. सुरतमध्ये ४० हेक्टर क्षेत्रफळावर रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार असून ते सुरत स्थानकापासून साधारण २ किमी अंतरावर उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> नव्याकोऱ्या सीएसएमटी – जालना वंदे भारतमध्ये तांत्रिक बिघाड
ठाणे, साबरमती आणि सुरत येथील डेपोत जलस्रोत व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवून त्याचा वापर केला जाणार आहे. तसेच बोअरवेलमधील पाण्याचाही वापर करण्यात येणार आहे. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. तसेच जवळपास ७० टक्के पाण्याची गरज प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून भागविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक डेपोत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
जपानी शिंकनसेन ट्रेन डेपोपासून प्रेरणा घेऊन भारतात बुलेट ट्रेनच्या देखभालीसाठी त्या प्रकारचे डेपो उभारण्यात येणार आहेत. या डेपोतील सुविधांमध्ये अत्याधुनिक, पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये समाविष्ट असतील. – सुषमा गौर, प्रवक्त्या, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसीएल)