मुंबई : करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्पाच्या कंत्राटातील गैरव्यवहाराप्रकरणी मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमिन छेडा यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने सोमवारी त्यांची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली. करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम अर्धवट असताना ते पूर्ण झाल्याचे सांगत मुंबई महापालिकेची सहा कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
हेही वाचा – मुंबई : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेसाठी कंत्राटी भरती
मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची पात्रता नसताना या कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंपनीला महानगरपालिकेची ९ रुग्णालये आणि जम्बो करोना केंद्रांमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण केले नाही, तरी २०२१ मध्ये काम पूर्ण झाल्याचे दाखवून सहा कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुवारी रोमिन यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानुसार, ते कागदपत्रांसह कार्यालयात हजर झाले. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची ८ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली होती.