लोकलच्या जीवघेण्या प्रवासाने त्रस्त झालेल्या मुंबई-ठाणेकरांचा प्रवास मोनो-मेट्रोमुळे काहीसा सुखकारक होणार आहे. मात्र एवढय़ावरच न थांबता लाखो मुंबईकरांना खऱ्या अर्थाने आनंददायी प्रवासाची मेजवानी देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. पाश्चिमात्य देशात सर्वाचेच आकर्षण असणारे ‘रोप वे’ आता महानगर प्रदेशातही उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार माथेरानबरोबरच नवी मुंबई- घाटकोपर आणि बोरिवली-ठाणे दरम्यान हे रोप वे उभारण्याची योजना एमएमआरडीएने हाती घेतली आहे.
ठाणे-मुंबईकरांसाठी उपनगरीय रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस नकोसा होत आहे. महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करून लोकलच्या जीवघेण्या प्रवासातून दिलासा (पान १३ वर) (पान ३ वरून) देण्यासाठी एमएमआरडीएने अनेक उपाययोजना हाती घेतल्या. मोनो, मेट्रोसारखे प्रकल्पही युद्धपातळीवर सुरू असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र एवढय़ावरच न थांबता ज्या भागात मेट्रोसारखे प्रकल्प शक्य नाहीत, त्या भागातील प्रवाशांनाही कमी वेळात प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी घाटकोपर ते नवी मुंबई, बोरिवली ते ठाणे आणि माथेरान अशा ठिकाणी रोप वे प्रकल्प उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. कमी खर्चात आणि कमी वेळात उभे राहणारे रोप वे पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे ज्या भागात वाहतूक व्यवस्थेसंदर्भात प्रकल्प उभारण्यास अडचणी येतात तेथे रोप वे प्रकल्प उभारण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली असून त्यांच्याच सूचनेनुसार तीन प्रकल्पांची आखणी करण्यात आली असून त्यांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम एमएमआरडीएने सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
हे मार्ग विचाराधीन..
- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून ठाण्यात घोडबंदर रोडवरील जयभवानीनगर दरम्यान ११ किमी लांबीचा रोप वे
(अपेक्षित खर्च : सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपये )
- वाशीच्या सागर विहार जेटी ते घाटकोपर बस डेपो (पूर्व द्रुतगती महामार्ग जवळ) हा आठ किमी लांबीचा रोप वे
(अपेक्षित खर्च : ८०० ते ९०० कोटी रुपये)
- भिवपुरी रोड स्थानक ते माथेरानमधील गार्बेट लॉर्डस गार्डन हा साडेतीन किमीचा रोप वे
मेट्रो, मोनोच्या तुलनेत रोप वे हे कमी वेळात आणि कमी खर्चात होणारे प्रकल्प असून मुंबई, ठाण्यात या प्रकल्पांमुळे लोकांची चांगली सोय होणार आहे. प्रवाशांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार असून शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठीही रोप वे आकर्षण ठरेल.
– प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए.