वर्षअखेपर्यंत थांबू नका, गरज असेल तसा निधी वळता करून घ्या, असा सल्ला वित्त खात्याने वारंवार देऊनही बहुतेक सर्वच विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तीन दिवसांत एकूण अर्थसंकल्पाच्या नऊ टक्के रक्कम म्हणजेच सुमारे १५ हजार कोटी रुपये विविध खात्यांनी उचल केली किंवा खर्च केले आहेत. हा सारा घोळ निस्तरताना वित्त खात्याची चांगलीच पंचाईत झाली आणि आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी रविवार असूनही कोषागरे उघडी ठेवावी लागली.
आर्थिक वर्षांचा शेवटचा दिवस रविवारी येत असल्याने ३० मार्चपर्यंत सर्व रक्कम वापरावी किंवा वळती करून घ्यावी, असे आदेश वित्त विभागाने मार्चच्या पहिल्याच आठवडय़ात काढले होते. ३० तारखेलाच आर्थिक वर्षांचे सारे व्यवहार पूर्ण करण्याची योजना होती. पण विविध विभागांना शेवटच्या क्षणी जाग आल्याने सारेच नियोजन कोलमडले. शनिवारी सायंकाळी घाईघाईतच रविवारी कोषागरे दुपापर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला. तसेच निधी वळता केला जातो ती बिम्स प्रणाली आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी दुपापर्यंत सुरू ठेवावी लागली. दुपारी २ वाजेपर्यंत खात्यांकडून येणारी मागणी नोंदवून घेण्यात येत होती.
विविध खात्यांनी आर्थिक शिस्त न पाळल्यानेच हा सारा प्रकार घडल्याचे वित्त विभागाच्या वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले. शेवटच्या तीन दिवसांत २०१२-१३च्या एकूण अर्थसंकल्पाच्या आठ ते नऊ टक्के रक्कम खर्च किंवा खात्यांना वळती करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २०१२-१३चा सुधारित अर्थसंकल्प हा १ लाख ७२ हजार कोटींचा झाला आहे. त्याच्या  आठ ते नऊ टक्के म्हणजेच सुमारे १५ हजार कोटींच्या आसपास बिले वित्त खात्याने मंजूर केली आहेत.
या साऱ्या घोळास वित्त विभागाने विविध खात्यांच्या प्रमुखांना जबाबदार धरले आहे. अगाऊ मागणी नोंदविली असती तर हा घोळ टाळू शकला असता, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. काही खात्यांमध्ये शेवटच्या दोन दिवसांमध्ये ठेकेदारांची बिले चुकती करण्याची लगीनघाई सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले.

Story img Loader