पोलीस म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. पोलीस नेहमी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करत असतात असा आरोप वारंवार केला जातो. अनेकदा हा आरोप फक्त दुसऱ्यांनी सांगितलेल्या अनुभवावरुन करण्यात आलेला असतो. मात्र अनेक पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना आपल्याला आखून देण्यात आलेल्या मर्यादा ओलांडत माणुसकी जपतात. रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षक विनीता शुक्ला यांनादेखील जेव्हा एक हरवलेला मुलगा सापडला तेव्हा नेमकं हेच केलं. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मुलगा सुखरुप पुन्हा आपल्या घरी परतला आहे. विनीता शुक्ला यांनी पश्चिम बंगालमधील दोन मुलींनाही अशाच प्रकारे आपल्या घरी सुखरुप पोहोचवलं आहे.
विनीता शुक्ला यांनी दादरमधील फुटओव्हर ब्रीजवर एक 17 वर्षीय मुलगा एकटा बसला असल्याचं पाहिलं. चौकशी केली असता त्यांना मुलगा बिहारचा आहे फक्त एवढीच माहिती मिळू शकली. जेव्हा अल्पवयीन मुलं आपल्या कुटुंबीयांची माहिती देण्यास असमर्थ असतात तेव्हा त्यांना वसतीगृहात पाठवलं जातं. आरपीएफनेदेखील तेचं केलं. मात्र मुलाचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरुन जात नव्हता. वारंवार त्यांना मुलाची चिंता सतावत होती. आपण त्याच्यासाठी काही करु शकलो नाही याची सल त्यांना जाणवत होती. अखेर त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. विनीता शुक्ला यांनी बिहारमधील स्थानिक पोलीस ठाण्याचा फोन क्रमांक मिळवला. 15 ऑगस्टला त्याने घऱ सोडलं होतं. विनीता शुक्ला यांच्या प्रयत्नामुळे मुलाची कुटुंबाशी भेट झाली आहे.
खाकी वर्दीतली माणुसकी: निर्मनुष्य रस्त्यावर तरुणीसाठी थांबवून ठेवली बस
‘बिहारमधील मुलाला व्यवस्थित ऐकू येत नव्हतं. घर सोडण्याधी त्याचं आपल्या चुलत भावाशी भांडण झालं होतं. 27 ऑगस्टला तो दादरला पोहोचला. आम्हाला जेव्हा तो भेटला तेव्हा प्रचंड घाबरला होता, आणि आठ दिवसांपासून त्याने काहीच खाल्लं नव्हतं’, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश मेनन यांनी दिली आहे.
हेड कॉन्स्टेबलने आपला डबा त्या घाबरलेल्या मुलासोबत शेअर केला. जेव्हा आरपीएफला त्याच्या कुटुंबीयांची माहिती मिळाली नाही तेव्हा त्याला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं.
‘त्याच्या कुटुंबीयांचा शोध लावू शकलो नाही ही गोष्ट मला सारखी सतावत होती. दरम्यान त्याच्याशी बोलत असताना त्याने बिहारमधील आरा या जागेचा उल्लेख केल्याचं माझ्या लक्षात आलं’, असं विनीता शुक्ला यांनी सांगितलं आहे. त्यांनी लगेचच इंटरनेटवर पोलीस ठाण्याची माहिती शोधण्यास सुरुवात केली. ‘मला लँडलाइन क्रमांक मिळाला, पण तो बंद होता. एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत मी यासंबंधी चर्चा केली असता त्यांनी मला आरा येथील एक पोलीस कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधेल असं सांगितलं’, अशी माहिती विनीता शुक्ला यांनी दिली.
जेव्हा आरा येथील पोलीस कर्मचाऱ्याने माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी त्यांना व्हॉट्सअॅपवर मुलाचा फोटो पाठवला. पोलीस अधिकाऱ्याने मुलगा जगदीशपूर येथून बेपत्ता झाला असून त्याचे आई-वडील शोध घेत आहेत अशी माहिती दिली.
मुलाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कुटुंबीय मुंबईला कसे येणार ही समस्या होती. ‘मी सरपंचांना पत्र लिहून गावकऱ्यांच्या मदतीने पैसे गोळा करण्याची विनंती केली. 14 सप्टेंबरला कुटुंब मुंबईत पोहोचलं. मात्र विकेण्ड असल्याने वसतीगृह बंद होतं. कुटुंबाला मुंबईत राहण्यासाठी पैसे आणि जागा नव्हती. आरपीएफने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. तसंच जेवण्यासाठी पैसे देऊ केले. 17 सप्टेंबरला जेव्हा मुलाची कुटुंबीयांशी भेट झाली तेव्हा तो क्षण पाहण्याजोगा होता’, असं विनीता शुक्ला यांनी सांगितलं आहे. मुलगा परत मिळाल्याने कुटुंबीय विनीता दत्ता यांच्या पाया पडत होतं. पाटलीपुत्र एक्स्प्रेसने पुन्हा घऱी पोहोचण्यासाठी विनीता शुक्ला यांनी त्यांना मदत केली.
13 सप्टेंबरला विनीता शुक्ला यांना 14 आणि 16 वर्षाच्या दोन मुलगी दादरला रस्ता विचारत असल्याचं आढळलं होतं. एका मुलीने आपली आई भेटणार आहे असं सांगत तिचा फोन नंबर दिला. पण तो स्विच ऑफ होता. यानंतर मुलींनी आपण खोटं बोलत असून पश्चिम बंगालमधील गोपाळनगरच्या रहिवासी आहोत, आणि मुंबईला पळून आलो असल्याचं सांगितलं. एकीने पाच हजार रुपये तर दुसऱ्या मुलीने सोन्याचे दागिने चोरले होते. वसतीगृहात त्यांची रवानगी केल्यानंतर कोलकाता पोलिसांशी संपर्क साधत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं.