लोकलमध्ये अडकलेल्यांना सुरक्षा दलाचा हात

मुंबई : रात्रभर सुरू असलेला मुसळधार पाऊस, रुळांवर दोन फुटांपर्यंत असलेले पाणी आणि त्यातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून होत असलेले प्रयत्न. असेच काहीसे चित्र कांजूरमार्ग ते दादर आणि टिळकनगर ते कुर्ला स्थानकांदरम्यान होते. सोमवारी मध्यरात्री १२ पासून मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत या स्थानकादरम्यान २२ लोकल गाडय़ांमधून २,५०० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

सोमवारी दिवसभर पडलेल्या पावसाने सायंकाळनंतर विश्रांती घेतली होती. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल गाडय़ा काही प्रमाणात सुरळीत होऊ लागल्या. परंतु रात्री आठनंतर पावसाने पुन्हा जोर पकडला आणि मंगळवारी सकाळपर्यंत दाणादाण उडवली. सोमवारी रात्री अकरापासून सायन, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर येथे रुळांवर पाणी साचले. ठाणे स्थानकाजवळही रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे सीएसएमटीकडे येणारी आणि येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल जागीच थांबल्या. स्थानकात थांबलेल्या लोकल गाडय़ांमुळे प्रवासी फलाटावर उतरले. परंतु दोन स्थानकांदरम्यान थांबून असलेल्या लोकलमधील प्रवासी मात्र अडकले. पाण्याची वाढलेली पातळी आणि बाहेर असलेला अंधार यामुळे लोकलमधून बाहेर पडण्याचीही भीती प्रवाशांना वाटत होती. त्यामुळे या प्रवाशांनी लोकलमध्येच थांबणे पसंत केले.

पावसाचा वाढलेला जोर आणि वाढत असलेली पाण्याची पातळी पाहता लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून स्थानक किंवा दोन स्थानकादरम्यान असलेल्या शॉर्टकट मार्गातून बाहेर काढण्याचा निर्णय मध्य रेल्वे सुरक्षा दलाने घेतला. नेमक्या कोणत्या स्थानकांदरम्यान किती लोकल व एक्स्प्रेस गाडय़ा उभ्या आहेत त्याची माहिती घेतली. त्यानुसार मध्यरात्री १२ पासून बचावकार्य सुरू केले.

कांजूरमार्ग ते दादर स्थानकादरम्यान अप-डाऊन धिम्या व जलद मार्गावर १९ लोकल, तर टिळकनगर ते कुर्ला दरम्यान तीन लोकल गाडय़ा अडकल्याचे समजताच जवळील स्थानकातून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रवाना करण्यात आले. खाद्यपदार्थाच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्याही सुरक्षा दलाने सोबत नेल्या.गडद अंधार असतानाही सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन फुटांच्या पाण्यातून प्रवाशांना सुखरूप ठिकाणी नेले. हीच परिस्थिती एक्स्प्रेस प्रवाशांचीही झाली. विक्रोळी ते सायन दरम्यान अप व डाऊन अशा तीन एक्स्प्रेस अडकल्या होत्या. या एक्स्प्रेस गाडय़ांमधूनही प्रवाशांची सुटका करण्यात आली. पहाटे पाचपर्यंत बचावकार्य सुरूच होते.

* कांजूरमार्ग ते दादर दरम्यान अप व डाऊन धिम्या व जलद मार्गावर ठाणे, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, खोपोली, पनवेल, वाशी यासह अनेक लोकल गाडय़ा अडकल्या होत्या.

* तर ट्रेन ११०१४ कोईम्बतूर जंक्शन ते एलटीटी, ट्रेन १२१०८ लखनऊ ते एलटीटी एक्स्प्रेस, ट्रेन १०१११ सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेससह कुशीनगर, वाराणसी आणि आणखी एक एक्स्प्रेस पाण्यात अडकल्याचे रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले.

कांजूरमार्ग ते दादर दरम्यान २२ लोकल गाडय़ा अडकल्या होत्या. रुळावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने या लोकलमधून सुमारे अडीच हजार प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मध्यरात्रीपासून बचावकार्य करण्यात आले. याशिवाय सहा मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांनाही सुखरूपपणे स्थानकापर्यंत नेले.

– के. के. अश्रफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे