मुंबई : ‘मिशन जीवनरक्षक’अंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि नागपूर या पाच विभागांतील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ८६ प्रवाशांचे जीव वाचवले. सर्वाधिक जीव मुंबई विभागात वाचवले असून ३३ प्रवाशांना जीवनदान दिले आहे. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून धावत्या लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांचा अंदाज चुकून तोल जातो. परिणामी रेल्वेचे पायदान आणि फलाटामधील मोकळय़ा जागी प्रवासी अडकतात.
मात्र, कर्तव्यावरील आरपीएफकडून प्रसंगावधान राखून अशा प्रवाशांना मरणाच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढतात. काही वेळा वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांचा जीव आरपीएफच्या जवानांनी वाचविला आहे. यामध्ये आरपीएफ जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवाशांचे प्राण वाचवतात. अशा घटनांमध्ये संपूर्ण मध्य रेल्वेमधील आरपीएफने ८६ प्रवाशांचे प्राण वाचवले. मुंबई विभागातून ३३ प्रवासी, नागपूर विभागात १७, पुणे विभागात १३, भुसावळ विभागात १७, सोलापूर विभागात ६ प्रवाशांचे जीव वाचवले. दरम्यान, धावत्या रेल्वेत चढून किंवा उतरून प्रवाशांनी जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.