पाच दिवसांत १३१ जणांना दंड
उपनगरीय रेल्वेच्या फुटबोर्डवर आणि दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास करणाऱ्या ‘दारगुंडां’च्या टोळक्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई सुरू केली आहे. गर्दीच्या वेळी ही टोळकी दरवाज्याची एक बाजू अडवून प्रचंड मनमानी करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी वारंवार केल्या आहेत. याच दरम्यान गाडीतून पडून प्रवाशांचे मृत्यू होण्याच्या घटना वाढल्यानंतर आता रेल्वे सुरक्षा दल सतर्क झाले असून ३ फेब्रुवारीपासून ही विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत पहिल्या पाच दिवसांमध्येच १३१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३९,३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
भावेश नकाते या तरुणाच्या अपघाताची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर याप्रकरणी उपनगरीय रेल्वेच्या दरवाज्यांत उभ्या राहणाऱ्या टोळक्यांचा काही हात होता का, असा संशय व्यक्त केला जात होता. ठरलेल्या वेळी, ठरलेली गाडी पकडणारी ही टोळकी दरवाज्यात उभी राहून टगेगिरी करत असतात. त्यांचे गट तयार झाल्याने इतर प्रवाशांवर वेळप्रसंगी दादागिरीही होते. या टोळक्यांकडून प्रवाशांना मारहाण झाल्याच्या घटनाही याआधी घडल्या आहेत. अशा टोळक्यांबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही आतापर्यंत काहीच कारवाई झाली नव्हती.
मात्र भावेश नकाते प्रकरणानंतर रेल्वे अपघात कमी करण्यासाठी पुढे सरसावलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने आता रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांविरोधातील मोहिमेबरोबरच दरवाज्यावरील टोळक्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी रेल्वेने १५ दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली असून ३ फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू झाली आहे. रविवारचा दिवस वगळून आतापर्यंत पाच दिवस या मोहिमेत १३१ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशाकडून ३०० रुपये या दराने त्यांच्याकडून ३९,३०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

लहानग्याने पाय गमावला
वांद्रय़ाहून मस्जिद बंदर येथे शिक्षणासाठी जाणारा काशीप हा १३ वर्षीय मुलगा सँडहर्स्टरोड ते डॉकयार्ड रोड या स्थानकांदरम्यान सोमवारी गाडीतून पडला. त्यात त्याला पाय गमवावा लागला असून जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तक्रारींची दखल
ही कारवाई प्रामुख्याने प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन करत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. पनवेल, बदलापूर, ठाणे, भायखळा, दादर, कुर्ला आणि वडाळा या स्थानकांजवळ अशा तक्रारी जास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या १५ दिवसांनंतरही ही कारवाई कायम सुरू राहणार असल्याचे भालोदे म्हणाले.

आकडेवारी
तारीख       पकडलेले प्रवासी
३ फेब्रुवारी   ३९
४ फेब्रुवारी  ३५
५ फेब्रुवारी  २३
६ फेब्रुवारी  २०
८ फेब्रुवारी  १४