मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीने जागा न सोडल्यास खुशाल बंडखोरी करा, असा सल्ला ‘रिपाइं’ अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
मुलुंड येथील कवी कालिदास नाट्यगृहात पक्षाचा ईशान्य मुंबई विभागाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये आठवले बोलत होते. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती आहे. ते जागा न सुटल्यास बंडखोरी करतात, मग आपल्या कार्यकर्त्यांनेसुद्धा बंडखोरी करुन निवडून येण्याची तयारी ठेवली पाहिजे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आगामी निवडणुकीत ‘रिपाइं’चे काही नगरसेवक निवडून आलेच पाहिजेत, त्यासाठी तयारीला लागा. जेथे आपण मजबूत आहोत, तिथे आपल्याला जागा सुटलीच पाहिज. नाही सुटली तरी बंडखोरी करा, असे आठवले म्हणाले.
नितीश कुमार यांना इशारा
बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. येथील महाविहारच्या न्यासवर ४ हिंदु विश्वस्त कसे काय आहेत. याप्रकरणी देशभर रान उठवण्यात येईल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तसा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आठवले यावेळी म्हणाले.