मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर बौद्ध धम्म परिषद आयोजित करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रेसकोर्स मैदनाचा उल्लेख करून २०२४ ची राजकीय शर्यत आम्हीच जिंकणार अशी घोषणा त्यांनी केली. या परिषदेला मोठया संख्येने लोक उपस्थित होते.
हेही वाचा >>> “ठाकरे डिमांड रूपया मिळाला की….”, अदाणी समूहाविरोधात काढलेल्या मोर्चावरून भाजपा नेत्याचा टोला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे स्वत:सह लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यानंतर दुसरा धम्म दीक्षा सोहळा मुंबईत १६ डिसेंबर १९५६ रोजी आयोजित करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु त्याआधीच ६ डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाल्याने तो दीक्षा समारंभ होऊ शकला नाही. रामदास आठवले यांनी तीच तारीख ठरवून शनिवारी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक बौद्ध धर्म गुरू दलाई लामा यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. परंतु यापैकी कुणीही परिषदेला उपस्थित नव्हते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर संविधान सन्मान सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही रेसकोर्सवर बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करून आपली राजकीय ताकद दाखवून दिली.
सूचक वक्तव्य
या रेसकोर्स मैदानावर उद्या घोडयांची रेस होणार आहे, २०२४ मध्ये एक रेस होणार आहे, त्यासाठीही घोडे तयार आहेत आणि ती रेस (शर्यत ) आम्हीच जिंकणार, असे आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयाबाबत सूचक वक्तव्य त्यांनी केले.