केंद्र तसेच राज्य सरकारने इंदू मिल जागेच्या भुमिपुजनासंदर्भात लवकर निर्णय घेतला नाहीतर येत्या ६ डिसेंबरला आम्हीच भुमिपुजन करू, असा धमकीवजा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी ठाण्यात दिला. तसेच भूमिपुजन रोखण्यासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या तर त्या सुद्धा झेलण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे येथील सेंट्रल मैदानात रिपाइं (आठवले गट) च्यावतीने आयोजित ‘संकल्प’ मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते. त्यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळालीच पाहिजे. पण, गेल्या वर्षभरात त्यासंबंधीची फाईल हलतच नाही. स्मारक उभारण्यासाठी त्या जागेचे आतापर्यंत भूमिपुजन झाले पाहिजे होते, असेही आठवले यांनी सांगितले. लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांमध्ये आम्हाला मतदान करा, तुम्हाला आम्ही घरे तसेच हवे तिथे बदली देऊ, असे आवाहनही त्यांनी यावेळी पोलिसांना केले. आमचे लोक निवडून येत नाहीत. पण, गेल्या दोन वर्षांत महायुतीसोबत राहून निवडून कसे यायचे, याविषयी समजले आहे. त्यामुळे आता आमचेही लोक निवडून येतील आणि काँग्रेसला चोख प्रतिउत्तर देतील, असेही त्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियन नर्तिकांचा मराठी गीतांवर बलून नृत्य
सेंट्रल मैदानात कार्यकर्त्यांचे जथ्थे दाखल होत होते..भव्य व्यासपीठावर सायंकाळी ऑर्केस्ट्रा सुरूच होता..त्यातील गीतांमध्ये कार्यकर्तेही दंग झाले होते..काही व्यासपीठावर तर काही मैदानात थिरकू लागले होते..त्यातच व्यासपीठाच्या दुसऱ्या बाजूला बलुन डान्सची तयारी सुरू होती..सायंकाळी ६.४५ रामदास आठवले आले आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी रिमोट कंट्रोलींग हॅलीकॉप्टरचा वापर करण्यात आला..मनोरंजनासाठी आणलेल्या दोन ऑस्ट्रोलियन नर्तिकांनी हातात रिपाइंचे झेंडे घेतले आणि बलुन डान्स सुरू केला. पण, मराठी गीतांवर नृत्य सुरू असल्याने कार्यकर्तेही बुचकूळात पडले. तसेच उपस्थितांना बलुन नृत्य म्हणजे काय.? हे समजण्याआधीच त्यांचे नृत्य संपले..त्यामुळे बलुन नृत्यविष्कार काहीसा फसल्याने कार्यकर्ते निराश झाल्याचे दिसून आले.

Story img Loader