आगामी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका व शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी ९ ऑगस्टला वसई येथे कार्यकर्त्यांचे शिबीर होणार आहे. त्यात लोकसभा व विधानसभेच्या कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा होणार आहे. जागावाटपाची चर्चा लवकरात लवकर सुरू करावी, यासाठी शिवसेना-भाजपवर दबाव आण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना, भाजप व आरपीआयने एकत्रितरीत्या लढविल्या. परंतु त्यानंतर मात्र महायुतीचा एकत्रित एकही कार्यक्रम झाला नाही.
लोकसभा व विधानसभा निवडणुका सेना-भाजपबरोबर राहूनच लढविणार, असे पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. परंतु त्यासाठी लवकरात लवकर तिन्ही पक्षांत जागावाटपाची चर्चा करावी, अशी सातत्याने आठवले मागणी करीत आहेत. परंतु त्यावर शिवसेना किंवा भाजपकडून कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नाही. त्यामुळे आरपीआयमध्ये अस्वस्थता आहे.
शिवसेना-भाजपकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आरपीआयने राज्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांचा विभागवार व जिल्हावार आढावा घेण्याचे सुरूकेले आहे. कोणते मतदारसंघ आरपीआयला फायद्याचे ठरू शकतात, याची यादी तयार करण्यात येत आहे. महायुतीत समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत, तर आरपीआयचा प्रभाव असलेल्या काही जागा स्वतंत्रपणे लढवाव्यात असाही पक्षात एक मतप्रवाह आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले, सुमंतराव गायकवाड, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.