प्रदेशाध्यक्षांसह अनेक महत्वाची पदे रिक्त
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर साऱ्याच लहान-मोठय़ा पक्षांनी संघटनात्मक फेरबदल करुन पक्षात उत्साह आणण्याचा प्रयत्न सुरु केला असताना रिपब्लिकन पक्षामध्ये मात्र गेल्या वर्षभरापासून प्रदेशाध्यक्षांसह महत्त्वाची पदे रिक्त असल्याने निरुत्साहाचे वातावरण आहे. रिपब्लिकन पक्ष म्हणजे रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील एक खांबी तंबू अशी अवस्था असल्याची चर्चा आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाची शिवसेना-भाजपबरोबर युती आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिका व इतर स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला फारसा प्रभाव दाखविता आला नाही. किंबहुना मुंबईत तर पक्षाला सपाटून मार खावा लागला. त्याचवेळी पक्षांतर्गत फेरबदल करण्याची मागणी केली जात होती. मात्र आठवले यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पक्षाची सभासद नोंदणी मोहीम हाती घेऊन त्यानंतर संघटनात्मक निवडणुका घेण्याचे त्यांनी जाहीर केले होते.
मंबईत आठवले यांच्या नेतृत्वाखालीच मार्च-एप्रिलमध्ये सभासद नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही फारसे उत्साहाचे वातावरण नाही. अलीकडेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. मुंबई काँग्रेसच्या अध्यपदी जनार्दन चांदूरकर या दलित नेत्याची निवड करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस व मुंबईच्या अध्यक्षपदी अशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. शनिवारीच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा भास्कर जाधव व जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे सगळे बदल होत असताना आरपीआयमधील संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होत नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
माजी राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांच्या निधनानंतर गेले वर्षभर आरपीआयचे प्रदेशाध्यक्षपद रिक्त आहे. त्या पदासाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते इच्छुक आहेत. मुंबईच्या संघटनेतही बदल व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र त्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा