शिवसेना-भाजप युतीमध्ये सामील झाल्यापासून रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या खासदारकी मिळविण्यासाठी सुरु असलेल्या तुणतुण्यामुळे सेना-भाजपचे नेते त्रस्त झाले आहेत. महागाई आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी युतीच्या आवाजात आवाज मिळविण्याऐवजी कधी बसपा बरोबर जाण्याच्या धमक्या तर कधी विधानसभा निवडणुकीनंतर विचार करण्याचा इशारा यामुळे रिपाईबरोबरची महायुती ही सेना-भाजपसाठी आवघड जागेचे दुखणे झाले असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
शिर्डीच्या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी टाकाऊ बनलेले रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी सेना-भाजपशी साथसंगत करण्याच्या आणाभाका घेतल्या, त्या राज्यसभेच्या जागेवर डोळा ठेवून. मात्र सेनेने अनिल देसाई यांना राज्यसभेची जागा दिल्यानंतर आठवले यांनी बराच थयथयाट केला होता. त्यावेळीही युतीतून बाहेर पडण्याच्या धमक्या देत प्रत्यक्षात वेळ आल्यावर ठरवू असा इशारा देऊन महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सातत्याने जागावाटपाचे गुऱ्हाळ रिपाईकडून लावण्यात येत आहे. कधी विधानसभेच्या जागांची मागणी करायची तर कधी लोकसभेच्या तीन जागा मागताना राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेत रिपाईने सेना-भाजपालाच त्रस्त करून सोडले. अलीकडेच रिपाईच्या मेळाव्यात बसपाबरोबर जाण्याचा इशाराही रामदास आठवले यांनी दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन राज्यसभेची जागा मिळावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करून बघीतली. उद्धव यांनी चलाखीने राज्यसभेची मोट भाजपच्या गळ्यात बांधली. मात्र भाजप नेत्यांनी झुरळ झटकावे तशी ही मागणी झटकल्यामुळे लोकसभेच्या तीन जागा आणि राज्यसभेची एक जागा मागण्याचे तुणतुणे रिपाईने वाजवतच ठेवले, असे हा नेता म्हणाला.
या साऱ्यात महायुतीचे काय होणार याची चिंता आता सेना-भाजपच्या नेत्यांना लागून राहिली आहे. सेना-भाजपला बदनाम करून आठवले यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली तर काय करायचे याचा विचार सध्या या दोन्ही पक्षांचे नेत करत असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत रिपाईचा फारसा फायदा झाला नाही. लोकसभेची निवडणूक लढविण्यास आठवले तयार नाहीत अशावेळी रिपाईला राज्यसभेची एक जागा देऊन युतीचा नेमका काय फायदा होणार आणि आठवले यांच्या इशाराबाजीचे करायचे काय,असा प्रश्न सेनेच्या नेत्यांना भेडसावत असल्याचे सेनेच्या या नेत्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा