आर. आर. पाटील यांची तब्येत गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून तेवढी साथ देत नव्हती, पण त्यांनी ऑक्टोबपर्यंत आजार अंगावर काढला, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हाही त्यांनी कोणालाच त्याची कल्पना दिली नव्हती. कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले याचा शोध पक्षाध्यक्ष शरद पवार यांना घ्यावा लागला होता.
विधानसभा निकालानंतर आर. आर. आबा मुंबईत पक्षाच्या बैठकीसाठी आले, तेव्हा त्यांचा चेहरा सुजलेला होता व गालाजवळ गाठ दिसत होती. तेव्हाच अनेकांनी आबांजवळ विचारणा केली होती. काही दिवसांतच आर. आर. यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २८ ऑक्टोबरला बायप्सी करण्यात आली आणि १४ नोव्हेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, असे डॉ. संजय उगेमुगे यांनी सांगितले.
आर. आर. यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती. कोणत्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याची माहिती पक्षाच्या नेत्यांना मिळत नव्हती. शेवटी आर. आर. यांच्यावर ब्रिच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे शरद पवार यांना समजले. तेव्हा आम्हाला कल्पना का दिली नाही, असे पवारांनी आर. आर. यांना दरडावूनच विचारले होते. शेवटच्या तीन महिन्यांत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आर. आर. पाटील यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सारी मदत केली होती. कुटुंबीयांची मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने मंत्रालयासमोरील वसंत डावखरे यांचे शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा