मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते. या हल्ल्यात शेकडो निरपराधांचे बळी गेले होते. या दु:खाची जखम भळभळत असतानाच, आर. आर. आबा बोलून गेले, ‘बडे बडे शहरो में छोटे छोटे हादसे होते रहते हैं!’ आबांना या घटनेची तीव्रता माहीत नव्हती असे नाही, पण राजकारणीही कधी कधी घसरतात. आबांचे त्या वेळी तसेच झाले होते. याची जबर किंमत आबांना मोजावी लागली होती. चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. दहशतवादी हल्ल्यामुळे भकास झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी चित्रपट निर्मात्यासोबत गेलेले तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्याची किंमत मोजावी लागली, तर या वक्तव्यामुळे आर. आर. पाटील यांना राष्ट्रवादीच्या मांदियाळीतील आपली पायरी गमवावी लागली. महाराष्ट्रापुढील समस्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणारा नेता अशी आर. आर. पाटील यांची प्रतिमा केवळ मंत्रिपदामुळे आणि अधिकाऱ्यांच्या ब्रीफिंगमधून मिळालेल्या माहितीमुळे तयार झालेली नव्हती. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा विरोधी बाकांवरील ‘अशांत टापू’ म्हणून ओळखळा जाणारा आमदारांचा एक कंपू, सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी टपलेला असायचा. आर. आर. पाटील यांच्याकडे तेव्हा तमाम माध्यमांचे लक्ष असायचे. त्यांच्या ‘लक्षवेधी सूचना’ हा बातम्यांचा खजिना असायचा. विधानसभेत लक्षवेधी सूचनांचा कार्यक्रम पुकारला गेला, की आर. आर. पाटील यांच्या वाणीला चढलेली धार मंत्र्यांना तलवारीसारखी असह्य़ वाटायची. एखाद्या प्रश्नाची सरकारकडेदेखील नसलेली माहिती आबांच्या पोतडीतून निघू लागली, की ‘चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल’, असे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याखेरीज दुसरा मार्ग मंत्र्यांकडे नसे. त्या काळात ‘लक्षवेधी सम्राट’ ठरलेले आबा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील अस्सल गावरान मातीत पोसलेल्या राजकारणातलं एक अजब रसायन होते. उसाच्या आणि सहकाराच्या राजकारणाचा वारसा असल्याखेरीज पाय रोवणेदेखील अशक्य असलेल्या भागात, कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेला हा नेता आपल्या संसदीय कामगिरीच्या जोरावरच पहिल्या फळीचा नेता बनला. मार्च २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्याकांडानंतर आबांचे कठोर रूप राज्याला पाहायला मिळाले. ‘आता चर्चा बंद. गोळीला उत्तर गोळीनेच’, अशी गर्जना करून त्यांनी पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविले. विरोधकांना अंगावर घेणारं आव्हानात्मक राजकारण करताना प्रसंगी चिमटे काढत, मिश्कील कोटय़ा करणाऱ्या आबांनी विरोधकांमध्येही जिव्हाळ्याचे मित्र जोडले. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांची राजकीय खिल्ली उडविली गेली. शेतक ऱ्यांना नाडणाऱ्यांना ‘कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू’ हे त्यांचे वाक्य महाराष्ट्रात चांगलेच गाजले. पण तो इशारा देतानाचा त्यांचा आवेश आठवून आजही अनेकजण हळवे होतात. ‘प्रत्येक घरात पोलीस दिला, तरी महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाहीत’, या त्यांच्या विधानावरही राळ उठली. पण ते परिस्थितीचे प्रामाणिक विश्लेषणच होते, याची कबुली विरोधक खासगीत देत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात बलात्कारासारख्या घटनांवर बोलताना आबांची जीभ घसरली. निवडणुकीच्या राजकारणात परस्परांना घेरण्यासाठी अशा वक्तव्यांवर नेहमीच वादळे माजविली जातात. आर. आर. पाटील यांनाही त्याला सामोरे जावे लागले. अशी वेळ आल्यानंतर काही राजकीय नेते काही काळ तरी पडद्यामागे जातात, पण आर. आर. पाटील यांच्यावर तसा प्रसंग आला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार होती. या कसोटीला ते यशस्वीपणे सामोरे गेले आणि आपले राजकीय वजन सिद्ध केले. त्यामुळेच, लहानशी शारीरिक चण असतानाही, राष्ट्रवादीचा ‘वजनदार नेता’ म्हणून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसच्या पराभवानंतर सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षात प्रभावी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. आर. आर. पाटील यांच्यासारख्या मोजक्या नेत्यांवरच विरोधी बाकांची भिस्त असताना, या नेत्याचा अस्त झाला आहे. विरोधी पक्ष हा जनतेच्या व्यथांचा आवाज असतो, असे मानले जाते. आबांच्या निधनामुळे हा आवाज काहीसा क्षीण होणार आहे.
दिनेश गुणे

Story img Loader