लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या गणेशभक्तांना मिळणारी उद्धट वागणूक आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या धक्काबुक्कीची गृहविभागाने गंभीर दखल घेतली असून भक्तांना अवमानास्पद वागणूक देणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांना सोमवारी दिले.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना तेथील कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केली जात आहे. तसेच महिलांनाही अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
यापुढे अशा प्रकारे भक्तांना-महिलांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना द्या आणि यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याकडे लक्ष द्या, असे आदेश पाटील यांनी सहपोलीस आयुक्त प्रवीण साळुंखे यांना दिले. त्याचबरोबर आतापर्यंत घडलेल्या घटनांची चौकशी करून त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही पाटील म्हणाले.
‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी आबालवृद्ध, महिला मोठय़ा श्रद्धेने येतात. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर मूर्तीसमोर आल्याबरोबर त्यांना कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. मोठय़ा भक्तिभावाने ते राजासमोर नतमस्तक होत असतानाच मंडळाचे बलदंड कार्यकर्ते त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने खेचून ढकलून देतात. महिला आहे की लहान मुले काहीही न पाहता त्यांचे डोके दोन हातात धरून ‘राजा’च्या पायावर जवळपास आदळतात आणि त्याच वेगात वरती उचलून रांगेतून ढकलून देतात. दरवर्षी जवळपास अशाच रीतीने कार्यकर्ते गणरायासमोरच त्याच्या भक्तांचा अवमान करीत असल्याच्या तक्रारी येत असतात.
पण यंदा गेल्या तीन-चार दिवसांत हा सारा भयंकर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि राजाच्या दरबारात भक्तांना पशूसमान वागणूक दिली जात असल्याची दृश्ये अवघ्या महाराष्ट्राने आणि देशानेही पाहिली.
मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या या धटिंगणशाहीमुळे सर्वत्र संतापाची भावना उसळली आहे. या पाश्र्वभूमीवरच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या घटनांची गंभीर नोंद घेत कारवाईचे संकेत दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा