आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात गुरूवारी सकाळपासून मोठय़ा संख्येने जमलेल्या आदिवासी बांधवांना राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तब्बल चार तास तळपत्या उन्हात तिष्ठत ठेवले. विशेष म्हणजे, आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचडही उशीरा आले. क्रांतीवीर भांगरे यांच्या स्मृतीदिनास आबा येणार म्हणून शेकडोंच्या संख्येंने जमलेल्या आदिवासींमध्ये सकाळी वेगळाच उत्साह जाणवत होता. मात्र, सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उन्हाचा पारा वाढू लागला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत आबा आणि पिचड यांचा पत्ताच नव्हता. त्यामुळे आदिवासी बांधवांनी उघडपणे संताप व्यक्त केला.
आदिवासी महादेव कोळी समाजातील आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे स्वातंत्र्य लढय़ात महत्वाचे योगदान आहे. २ मे १८४८ मध्ये इंग्रजांनी त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात आदरांजलीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही अशाचप्रकारच्या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी सकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमासाठी पुणे, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्य़ातील अन्य भागातून आदिवासी समाजाचे बांधव मोठय़ा संख्येने आले होते. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मात्र, दोन्ही नेते तब्बल चार तास उशीरा आल्याने जमलेल्या आदिवासी बांधवांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पुणे येथील जुन्नर भागातून सकाळी ९ वाजता ठाण्यात कार्यक्रमासाठी आलो. मात्र, नेते उशीरा आल्याने भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. तसेच दरवर्षी नेते उशीरा येत असल्यानेच या कार्यक्रमासाठी येणाऱ्या बांधवांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे, असे आदिवासी युवक क्रांतीदल महासंघाचे अध्यक्ष रामचंद्र निर्मळ यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले एका कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस परमेश्वर माठे यांनीही नेतेमंडळी उशीरा आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे रणरणत्या उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या महिला वर्गातूनही यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पिचड यांनी क्रांतीवीर भांगरे यांच्या स्मारकासाठी दहा लाख तर विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी पाच लाख रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. तसेच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक आणि सभागृह उभारण्यासाठी शासनामार्फत सर्वात्तपरी मदत करण्यात येईल तसेच त्यांचा इतिहास तरूण पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी संशोधानाची संधीही उपलब्ध करून देण्यात येईल, असे आबांनी सांगितले.
नेते आरामात अन् आदिवासी बांधव भर उन्हात..
आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात गुरूवारी सकाळपासून मोठय़ा संख्येने जमलेल्या आदिवासी बांधवांना राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तब्बल चार तास तळपत्या उन्हात तिष्ठत ठेवले. विशेष म्हणजे, आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचडही उशीरा आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2013 at 03:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rr patil reached 4 hour late to pay homage on raghoji bhangre anniversary