दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर शक्ती मिल परिसरातील बलात्कार प्रकरणामुळे मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे या खटल्यातील आरोपींना काय शिक्षा होते याबाबत उत्सुकतेचे वातावरण होते. खटल्याच्या सुनावणीसाठी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हेही बुधवारी न्यायालयात उपस्थित होते. खटल्याचे कामकाज संपेपर्यंत ते न्यायालयात होते.
सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपींच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला. सामूहिक बलात्कार प्रकरणात किमान शिक्षा ही २० वर्षे सक्तमजुरीची आहे, तर कमाल शिक्षा ही जन्मठेपेची आहे. आरोपींना आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी विशेष निकम यांनी न्यायालयाकडे केली. या खटल्यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश असून त्यांच्यावर बाल न्यायमंडळासमोर स्वतंत्र खटला चालविण्यात येणार आहे. लवकरच या
खटल्याच्या कामकाजाला सुरुवात होईल, अशी माहितीही निकम यांनी दिली.
न्यायालयाच्या या निकालाचे मी स्वागत करतो. मात्र अशा प्रकारच्या निर्घृण गुन्ह्य़ांमध्ये बाल गुन्हेगारांसाठी वयोमर्यादा १८ ऐवजी १६ असली पाहिजे. १६ वर्षांवरील गुन्हेगारांना वयाचा दिलासा मिळता कामा नये. टेलिफोन ऑपरेटवरील बलात्कार प्रकरणात तर पुरावे मिळविणे आणखीन कठीण आहे.
– हिमांशु रॉय,
दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख़
घटनाक्रम..
*२२ ऑगस्ट २०१३- महिला छायाचित्रकारावर शक्ती मिल परिसरात सात जणांकडून सामूहिक बलात्कार
*२३ ऑगस्ट २०१३-देशभरातील प्रसार माध्यमांमधून टिकेची झोड उठल्याने संपूर्ण पोलीस दल आरोपींच्या शोधासाठी कार्यरत.
*अवघ्या २४ तासांत १७ वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला अटक. त्यानंतर आठवडाभरात अन्य सहा आरोपींना अटक
*१९ सप्टेंबर २०१३-मुंबई पोलिसांकडून ६०० पानांचे आरोपपत्र दाखल
*११ ऑक्टोबर २०१३- बलात्कार प्रकरणी आरोपींवर आरोप निश्चित
*१८ ऑक्टोबर २०१३- बलात्कार झालेल्या तरुणीने न्यायालयात आरोपींना ओळखले
*५ मार्च २०१४- आरोपींचा जबाब न्यायालयाने नोंदविला
*२० मार्च २०१४ न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले.
गुन्हेगारांवर दहशत बसेल -गृहमंत्री
हा खटला जेवढय़ा जलदगतीने चालवता येईल तेवढय़ा गतीने चालविण्यात आला आणि संबंधित तरुणींना न्याय मिळाला. हा निकाल स्वागतार्ह असून त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याची दहशत बसेल, असा विश्वास गृहमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
आधीही बलात्कार
शक्ती मिलप्रकरणी तपास करत असताना याच आरोपींनी एका दूरध्वनी ऑपरेट तरुणीवर बलात्कार केल्याचे आढळून आले. ३ सप्टेंबर २०१३ रोजी पीडित तरुणीने आरोपींच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३६२ पानांचे आरोपपत्र दाखल केले. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी न्यायालयाने आरोपींचा जबाब नोंदविला.