तासगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कै. आर. आर. पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढावे म्हणून काँग्रेसने नारायण राणे यांच्याकडे आग्रह धरला आहे.
आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता या राजकीयदृष्टय़ा सक्रिय असून, युवती आघाडीच्या माध्यमातून त्या काम करतात. विधानसभा निवडणुकीत आर. आर. यांच्या प्रचाराची सारी सूत्रे स्मिता यांनीच हाताळली होती. निवडणूक लढविण्यासाठी आर. आर. यांच्या कन्येचे वय कमी पडत असल्याने त्यांच्या पत्नी सुमनताई यांना उमेदवारी देण्याचे  निश्चित झाले आहे. या संदर्भातील घोषणा लवकरच करण्यात येईल. आर. आर. पाटील यांच्याबद्दल असलेली सहानुभूती लक्षात घेता या मतदारसंघात पोटनिवडणूक जड जाणार नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.  वांद्रे मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसश्रेष्ठींनी सादर केला आहे. राणे यांनी आपले पत्ते अद्याप खुले केलेले नसले तरी राणे यांनी रिंगणात उतरावे म्हणून काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राणे यांनी पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेसने राणे यांना उमेदवारी देऊ केली आहे.

Story img Loader