मुंबई : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टरची १२०० कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वाकोला पोलीस ठाण्यात एका विदेशी कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या तत्कालीन उपाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून त्याद्वारे सिंगापूरमधील अर्बीट्रेशन पिटीशनमध्ये १४०.९३ दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे १२०० कोटी रुपयांचा ) दावा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या नूडल्समध्ये झुरळ; कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहातील प्रकार

तक्रारीनुसार, रिलायन्स एनर्जी लि.(आताचे रिलायन इन्फ्रास्ट्रक्चर) या कंपनीच्या नावाने सासन प्रकल्पाकरता २६ जून, २००८ तारखेचे व बुटीबोरी प्रकल्पाकरता २ सप्टेंबर, २००८ तारखेचे बनावट हमीपत्र (गॅरंटी लेटर) तयार करण्यात आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्या पत्रावर कंपनीचे तत्कालीन उपाध्यक्षांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पुढे ते पत्र विदेशी कंपनीने सिंगापूर येथील इंटरनॅशनल अर्बीट्रेशन सेंटर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीविरूध्द दाखल १२०० कोटी रुपयांच्या दाव्यासाठी दाखल केले व त्याद्वारे फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे उपाध्यक्ष नीरज पारेख यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी प्राथमिक चौकशी केल्यानंतर बुधवारी वाकोला पोलीस ठाण्यात चीनमधील बहुद्देशीय कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> विशाळगड प्रकरणाबाबत वादग्रस्त पोस्ट अपलोड करणाऱ्याला अटक

भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट कागदपत्रे तयार करणे),४६७ (मौल्यवान वस्तू बनावट तयार करणे), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट करणे), ४७१ (खोटे कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून वापरणे) आणि १२० ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.