मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नागपूर – शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते. वर्षभरात या मार्गावरून ५८ लाख १ हजार १५४ वाहनांनी प्रवास केला आहे. तर, या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लाख ७९ हजार ३९९ रुपये पथकर वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे होणार ‘अभिमत आरोग्य विद्यापीठ’!
राज्याची राजधानी आणि उपराजधानी यामधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७०१ किमीचा समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा महामार्ग आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी कामास विलंब झाला असून एमएसआरडीसीने टप्प्याटप्प्यात हा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. तर, मे २०२३ मध्ये शिर्डी – भरवीर अशा ८० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते.
७३ अपघातात १४२ जणांचा बळी..
समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यापासून हा मार्ग अपघातांमुळे वादात सापडला आहे. वर्षभरात या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आतापर्यंत (डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३) या महामार्गावर ७३ अपघात झाले. यात १४२ प्रवाशांचा बळी गेला. सर्वाधिक २० अपघात हे वाहनांवरील नियंत्रणामुळे झाले.