मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षांसाठी यंदा प्रथमच १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे परीक्षेच्या स्वरुपाबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यास मदत होऊन त्यांच्या मनातील शंका व भीती दूर होण्यास मदत होणार आहे. या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
एमएचटी सीईटीअंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता राज्य व्यावसायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विद्यार्थ्यांना यापूर्वी ऑनलाईन सराव प्रश्न संच उपलब्ध करण्यात येत होते. या प्रश्नसंचामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न येतील याचा अंदाज येत असल्याने विद्यार्थ्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. या सुविधेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी यावर्षीपासून एमएचटी सीईटीच्या विद्यार्थ्यांबरोबरच अन्य १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बी.एड, एमबीए/एमएमएस, बीए बीएस्सी बीएड, एमएड, एपीएड, बीएड.एमएड या अभ्यासक्रमांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या पाच परीक्षा देता येणार आहेत. मॉक टेस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पाच परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरुप समजण्याबरोबरच त्यांना परीक्षेतील प्रश्नांच्या काठीण्यपातळीचाही अंदाज येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा देताना विद्यार्थ्यांवर असलेला मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल व ते मोकळ्या मनाने परीक्षा देऊ शकतील, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नायगाव बीडीडीच्या जागेवर ६५ मजली तीन इमारती ,पुनर्विकासाअंतर्गत विक्री घटकातील १,८०० घरांच्या कामाला अखेर सुरुवात
मॉक टेस्टसाठी मोजावे लागणार पैसे
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज यावा, त्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा यासाठी मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र या मॉक टेस्टसाठी विद्यार्थ्यांना ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी केल्यानंतर अटल उपक्रमाच्या लिंकवरून विद्यार्थ्यांना मॉक टेस्टसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी आणि ५०० रुपये शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पाच परीक्षा देता येणार आहेत.