मुंबई : पुनर्विकास प्रकल्पातील करारानुसार ५७ कोटी रुपये न देऊन फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम कंपनीच्या संचालकाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गोरेगाव येथील उन्नत नगर परिसरात सुरू असलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाबाबतचे हे प्रकरण असून ते पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

अंधेरी (पश्चिम) येथील रहिवासी असलेले तक्रारदार शकील तन्वर (५४) ओशिवरा येथील पॉलिकॉन रिएल्टर्स बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. तक्रारीनुसार, त्याच्या कंपनीने २००३ मध्ये गोरेगाव येथील उन्नत नगर परिसरातील ९१४९ चौ.फूट जागेचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी तेथील ९२ सभासदांपैकी ८२ जणांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले. या प्रकल्पाचे २००५ मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले. त्यावेळी काही रहिवाशांनी घरे रिकामी केली नाहीत. तसेच हाऊसिंग सोसायटीने २० कोटी रुपये बँक हमी मागितली. त्यामुळे बांधकाम बंद झाले.

बँक हमीचे २० कोटी रुपये देणे शक्य नसल्यामुळे तक्रारदारांच्या कंपनीने बांधकाम क्षेत्रातील आणखी एका कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी या प्रकल्पाचे बांधकाम व २० कोटी बँक हमीची जबाबदारी या बांधकाम कंपनीने घेतली. त्या बदल्यात तन्वर यांच्या कंपनीला पाच कोटी रुपये व प्राप्त होणाऱ्या चटई क्षेत्रातील २५ टक्के हिस्सा देण्याचे मान्य केले. पुढे प्रकल्पाचा खर्च वाढल्यामुळे २००९ मध्ये २५ टक्क्यांऐवजी १८ टक्के हिस्सा तक्रारदारांच्या कंपनीला देण्याचे आरोपी बांधकाम कंपनीने मान्य केले. याबाबत करार झाल्यावर तक्रारदार कंपनी पॉलिकॉन रिएल्टर्सला पाच कोटींपैकी अडीच कोटी रुपये मिळाले. पुढे आरोपी व्यावसायिक कंपनीकडे तक्रारदार कंपनीने उर्वरीत अडीच कोटी रुपये मागितले असता त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. या दोन कंपन्यांमधील वाद मिटवण्यासाठी उच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. उभयतांचे म्हणणे ऐकल्यावर सामजस्याने वाद मिटविण्याशी संबंधित करार करण्यात आला. या करारानुसार अतिरिक्त चटई क्षेत्र, फंजिबल चटई क्षेत्र व इतर देयके असे एकूण ५७ कोटी ७७ लाख ९ हजार रुपये आरोपी कंपनीने अद्यापर्यंत तक्रारदार कंपनीला दिलेले नाहीत. तसेच करारानुसार या रकमेवरील १८ टक्क्यांप्रमाणे व्याजही तक्रारदारांच्या कंपनीला मिळाले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी नुकतीच तन्वर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी बांधकाम कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे.

Story img Loader