मुंबई : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत सहस्रबुद्धे (वय ५७) यांचे शुक्रवारी पहाटे ४ वाजता निधन झाले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अपघातानंतर आठ महिने ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.जयंत सहस्रबुद्धे यांनी विज्ञान भारतीचे कार्य जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तरुण वयात असामान्य कार्य करताना, भारतीय विज्ञान आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान या विषयावर विमर्श घडवण्याचे उल्लेखनीय काम त्यांनी केले. विज्ञान भारतीच्या अनेक आयामांना आणि अनेक उपक्रमांना गती आणि मार्गदर्शन देण्याचे काम जयंतजी अखंड करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहस्रबुद्धे यांचा जन्म १७ एप्रिल १९६६ रोजी गिरगाव (मुंबई) येथे झाला. त्यांचे वडील श्रीकांत सहस्रबुद्धे आजही संघ कार्याशी निगडित आहेत. त्यांची आई राष्ट्रसेविका समितीच्या सक्रिय कार्यकर्त्यां होत्या. भाभा अणुसंशोधन केंद्रात काही काळ काम करणाऱ्या सहस्रबुद्धे यांनी १९८९ मध्ये नोकरी सोडली आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये संघ प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली. गोव्यात विभाग प्रचारक राहिल्यानंतर २००१ ते २००९ पर्यंत ते कोकण प्रांताचे प्रांत प्रचारक होते. स्वामी विवेकानंद आणि विज्ञान, महेंद्रलाल सरकार, प्रफुल्लचंद्र रॉय, जगदीश चंद्र बोस, मेघनाद साहा, सी.व्ही. रमण या भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवनावर त्यांनी व्याख्याने दिली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss campaigner jayant sahasrabuddhe passed away amy