काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधील एका लेखात हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी आयआयटीतील विद्यार्थ्यांना मांसहाराचे सेवन करण्याच्या मुद्द्यावरून हिंदूविरोधी ठरविण्यात आले होते. मात्र, आता या मुद्द्यावरून संघाला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. कारण, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या अनेक नेत्यांनी वैयक्तिक जीवनात मांसाहाराचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. गेली अनेक वर्षे संघाच्या कार्यपद्धतीचे अभ्यासक असणाऱ्या दिलीप देवधर यांनी ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना याबाबतचा खुलासा केला. २००९मध्ये सरसंघचालक होईपर्यंत मोहन भागवत अनेकदा मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेत असत. याशिवाय, बाळासाहेब देवरस हेदेखील सरसंघचालक होईपर्यंत चिकन आणि मटनापासून बनलेले पदार्थ खात होते. इतकेच काय, संघाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मांसाहारी पदार्थ खातात. यामध्ये हिंदुत्वविरोधी असे काहीही नसल्याचे मत दिलीप देवधर यांनी व्यक्त केले. देवधर यांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ४२ पुस्तके लिहली आहेत. संघाने आजपर्यंत कधीही मांसाहाराला विरोध केलेला नाही. मासे, चिकन आणि मटन या एका मर्यादेपर्यंत मांसाहारी पदार्थांचे सेवन करण्यास संघाची कोणतीच हरकत नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ‘ऑर्गनायझर’मध्ये छापून आलेला लेख हा संघातील मोजक्या लोकांच्या विचाराचे प्रतिबिंब असल्याचेही देवधर यांनी सांगितले. दरम्यान, या सगळ्याबद्दल बोलताना ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी आमच्या मासिकाचा रा.स्व.संघाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. आमचे मासिक केवळ संघाच्या विचारसणीपासून प्रेरित झालेले आहे. अनेकदा ‘ऑर्गनायझर’मधून संघ आणि भाजपच्या निर्णयांवर टीका झाल्याचेही प्रफुल्ल केतकर यांनी सांगितले. याशिवाय, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लेख आयआयटीचे माजी विद्यार्थी असणाऱ्या संदीप सिंग यांनी लिहला होता. या लेखात त्यांनी स्वत:चे वैयक्तिक विचार मांडले होते आणि आम्ही त्याच्याशी सहमत नाही. मात्र, तरीही सिंग यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकार असल्याचे केतकर यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा