RSS Leader Bhaiyyaji Joshi on Mumbai’s Language : मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे”, असं वादग्रस्त वक्तव्य जोशी यांनी केलं आहे. त्याचबरोबर “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात”, असंही त्यांनी म्हटलं आहे. विद्याविहार येथील एका नामांतराच्या कार्यक्रमात बोलताना संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत.

भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.

वाद निर्माण होण्याची शक्यता

मुंबईसह आसपासच्या भागात अलीकडच्या काळात सातत्याने मराठी भाषिकांवर अमराठी लोकांकडून हल्ले झाल्याच्या, मराठी भाषेसंबंधीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच संघातील वरिष्ठ नेत्याचं अशा प्रकारचं वक्तव्य वाद निर्माण करणारं ठरू शकतं.

ठाकरे गटाचा संताप

दरम्यान, जोशी यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेने (ठाकरे) संताप व्यक्त केला आहे. “सध्याच्या महाराष्ट्रातील भाजाप्रणित सत्ताधाऱ्यांना, एकनाथ शिंदे यांना भय्याजी जोशी यांचं हे वक्तव्य मान्य आहे का?” असा प्रश्न शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले, “मुंबईची भाषा मराठीच आहे. सत्ताधाऱ्यांनी जोशींच्या वक्तव्यावरील त्यांची भूमिका जाहीर करावी.”

Story img Loader