मुंबई : मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आरक्षण विरोधी आहे, त्यामुळे राज्यातील भाजप सरकार हे विविध समाजाला आरक्षणांची आश्वासने देऊन त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना केली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंम्डे यांनीही आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकाच्या भूमिकेवर टीका केली. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास असा स्वतंत्र प्रवर्ग तयार करुन आरक्षण दिले, तर त्याचा केंद्रीय सेवा व शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी उपयोग होणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले.
राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस मान्य करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्टय़ा मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याची घोषणा केली. पण हे पुरेसे नाही. मराठा समाजाला ओबीसीच्या सध्याच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ओबीसी प्रवर्गात एक वेगळा उपप्रवर्ग तयार करून, १६ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे, परंतु सरकार ते करणार नाही, असे ते म्हणाले.
सामाजिक आरक्षणाबाबत सरकारच्या मनात काळेबेरे असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला. धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घुमजाव केले आहे, असे विखे म्हणाले.