मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी भाजप मंत्र्यांचे शनिवारी दिवसभर ‘बौद्धिक’ घेतले असून उर्वरित काही मंत्र्यांचा वर्ग रविवारी घेण्यात येणार आहे. श्रीमंतीचे प्रदर्शन, बडेजाव व सत्तेचा गर्व येऊ न देता जनहिताची कामे करावीत आणि जनमानसातील सरकारची प्रतिमा जपावी, अशा सूचना वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत संघ फारसा सक्रिय न राहिल्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात बसला. मात्र विधानसभेत संघाच्या भरीव कामगिरीमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या कामगिरीबाबत आता संघही ‘दक्ष’ राहणार आहे. त्यामुळे सत्तेवर आल्यावर काही दिवसांतच संघाने भाजप मंत्र्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्यापुढे अपेक्षा मांडण्यासाठी परळच्या यशवंत भवन कार्यालयात दिवसभराचा वर्ग आयोजित करून चिंतनही केले. संघाचे राष्ट्रीय सहसरकार्यवाह अरुणकुमार, क्षेत्रीय सहसरकार्यवाह अतुल लिमये, क्षेत्र प्रचारक सुमंत अमशीकर आदींसह संघाच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.

हेही वाचा…बुलेट ट्रेनमुळे नागरिकरण वाढेल; रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचा विश्वास, बुलेट ट्रेन कार्यस्थळी रेल्वे मंत्र्यांचा पाहणी दौरा

बीडचा मुद्दाही चर्चेत

राज्यभरातून आलेल्या संघाच्या पदाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न, निवडणूक काळात व सध्या जनतेकडून मांडण्यात येणारे मुद्दे व अपेक्षांचे विवेचन केले. सोयाबीन, कापूससह शेतीमाल व शेतकऱ्यांचे प्रश्न, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मुद्दे, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातून होत असलेली सरकारची व मंत्र्यांची बदनामी आदी अनेक मुद्दे या दिवसभराच्या चर्चेत उपस्थित झाले.

हेही वाचा…कल्याणमधील महाराष्ट्रीय कुटुंबावरील हल्ल्याचे प्रकरण : पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रिकरण जतन करा, उच्च न्यायालयाचे खडकपाडा पोलिसांना आदेश

अनेक पदाधिकाऱ्यांनी अनुभव कथन केले आणि सरकार व संबंधित मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महायुतीच्या आमदारांची नुकतीच बैठक घेऊन सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून पाळावयाची पथ्ये, बदल्या व भ्रष्टाचारापासून दूर राहावे, जनहिताची कामे करावीत, आदी सूचना दिल्या होत्या. संघाचे नेते व पदाधिकाऱ्यांनीही त्याच धर्तीवर सूचना व अपेक्षा मांडल्या. मंत्र्यांनीही आपले खात्यातील व राजकीय अनुभव व मुद्दे मांडले. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही मंत्री शनिवारी बैठकीत सहभागी झाले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्य काही मंत्री रविवारी या बैठकीत सहभागी होणार आहेत.