मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. दुर्बल वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासह अन्य मंडळांच्या एकूण ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध आहेत.
या प्रक्रियेतंर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५५ शाळांमध्ये ४ हजार ६८५ जागा असून इतर मंडळांसाठी ७२ शाळांमध्ये १ हजार ३६८ जागा आहेत. अशा एकूण ३२७ शाळांमधे ६ हजार ५३ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालकांकडून १४ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची सुविधा https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक पालकांनी दिलेल्या कालावधीत आपल्या पाल्यांचे अर्ज भरावेत, असे आवाहन महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>आरोग्य राज्यमंत्र्यांसाठी ‘एसबीटीसी’चेच संक्रमण
पालकांनी अर्ज भरतांना विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. तसेच यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत बालकांचा शाळेत प्रवेश घेतलेल्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन सोडत काढण्यासाठी दिवस निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.