माहिती अधिकार (आरटीआय) आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष धोरण आखण्याबाबत दिरंगाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून वारंवार चपराक बसलेल्या राज्य सरकारने अखेर हे धोरण निश्चित केले आहे. सोमवारी उच्च न्यायालयात तशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे धमकी मिळालेल्या ‘आरटीआय’ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या संरक्षणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
याप्रकरणी वारंवार आदेश देऊनही त्याची पूर्तता न करणाऱ्या आणि एकूण समस्येबाबत मूग गिळून गप्प बसलेल्या राज्य सरकारला न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस या धोरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शेवटची संधी दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली असता अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशपांडे यांनी धोरण निश्चित करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.
नव्या धोरणानुसार, आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धमकी आल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना लगेचच पोलीस संरक्षण दिले जाईल. माहिती अधिकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसंदर्भात ‘अमायकस क्युरी’ने (न्यायालयाचा मित्र) केलेल्या शिफारशी हे धोरण निश्चित करताना मान्य करण्यात आल्या असून त्यानुसार, जिल्हा, आयुक्तालय आणि राज्य अशी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरक्षा पुरविण्याबाबत केलेल्या अर्जाची शहानिशा करेल.
याशिवाय धोरणानुसार, अशा प्रकारच्या प्रकरणांवर देखदेख ठेवण्याचे अधिकार राज्य आयोगाला देण्यात आले असून आरटीआय-सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडेही धमकीबाबतच्या तक्रारी करू शकतात. अंतरिम सुरक्षा दिल्यानंतर ते पुढे सुरू ठेवावे की नाही याबाबच राज्य आयोगाकडून सतत त्याचा आढावा घेतला जाईल. या प्रकरणांचा तपास उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांकडूनच केला जाईल. यावरही राज्यस्तरीय समितीद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
‘आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आता विनाशुल्क सुरक्षा
माहिती अधिकार (आरटीआय) आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष धोरण आखण्याबाबत दिरंगाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून वारंवार चपराक बसलेल्या राज्य सरकारने अखेर हे धोरण निश्चित केले आहे.
First published on: 05-03-2013 at 04:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rti and social supporters now gets the security without any cost