मुंबई : एकीकडे मराठी भाषा गौरव दिनी मध्य रेल्वेमार्गावरील स्थानके मराठी अभिमान गीताने दुमदुमत असली तरी दुसरीकडे स्थानकांची नावे चुकीची लिहिली जात आहेत. त्याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून देखील नावांत बदल झालेला नाही. मध्य रेल्वेच्या मूळ दस्तऐवजातच स्थानकांच्या मराठी नावांची नोंद चुकीची असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील ‘ऐरोली’, ‘रबाळे’, ‘घणसोली’, ‘कोपरखैरणे’ या स्थानकांची नावे अनुक्रमे ‘ऐरावली’, ‘राबाडा’, ‘घनसोली, ‘कोपर खैर्ना’ अशी लिहीली जात आहेत.

मध्य रेल्वेच्या अख्यारितील ट्रान्स हार्बर मार्गिका नोव्हेंबर २००४ रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर २००७ साली रबाळे स्थानक सुरू झाले. ट्रान्स हार्बर मार्गिका सुरू झाल्याने ठाणे ते नवी मुंबईला जाणारा वेगवान आणि स्वस्त मार्ग सुरू झाला. परंतु, ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांची नावे चुकीच्या पद्धतीने उच्चारली जातात. तसेच चुकीच्या पद्धतीने लिहून दर्शनी भागी लावण्यात येतात. त्यामुळे त्या गावांच्या मूळ मराठी नावांचा अपभ्रंश होत आहे. याबाबत समाज माध्यमांवरून अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. स्थानकांच्या नावात दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे. परंतु, मध्य रेल्वेने त्या तक्रारींवर कोणत्याही प्रकारे कार्यवाही न केल्याने स्थानकांची चुकीची नावे अंगवळणी पडत आहेत. हे अन्यायकारक आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

माहिती अधिकारी कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी ठाणे ते वाशी रेल्वेमार्गावरील स्थानकांच्या नावांची मराठी आणि इंग्रजीमधील अधिकृत नोंद माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने माहितीनुसार ठाणे, दिघा गाव, ऐरावली, राबाडा, घनसोली, कोपर खैर्ना, तुर्भे, सानपाडा, वाशी अशी स्थानकांची नोंद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऐरोली रेल्वे स्थानकाचे नाव ‘ऐरावली’, रबाळे रेल्वे स्थानकाचे नाव ‘राबाडा’, घणसोली रेल्वे स्थानकाचे नाव ‘घनसोली’ आणि कोपर खैरणे रेल्वे स्थानकाचे नाव ‘कोपर खैर्ना’ असे चुकीच्या पद्धतीने लिहिले जात आहे. परिणामी, लोकलमधील सूचना फलकावर व इतर ठिकाणी रेल्वे स्थानकांची चुकीची नावे प्रवाशांच्या दृष्टीस पडत आहेत.

रेल्वेकडून महापुरुषांच्या नावाचा अनादर

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकाचे नाव हिंदीतही टिळक असे अपेक्षित आहेत. कारण हिंदी वर्णमालेत ‘ट’ वर्ण आहे. मात्र, अजूनही ‘तिलक’असेच लिहिले जाते. यामुळे संपूर्ण देशात त्यांचे नाव विकृत स्वरूपात लिहिले जात असून मध्य रेल्वेकडून महापुरुषांच्या नावाचा अनादर केला जात आहे, असे मत मराठीप्रेमींनी व्यक्त केली.

Story img Loader