वर्षांला सुमारे ९०० कोटी फस्त करणारे दलालांचे जाळे मोडून काढण्याचा प्रयत्न आणि ठाण्याच्या आर.टी.ओ. अधिकाऱ्याचे निलंबन या कठोर कारवायांची शिक्षा परिवहन आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेले महेश झगडे यांना भोगावी लागली आहे. विशेष म्हणजे, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्यावर विरोधी पक्षात असताना आवाज उठविणाऱ्या भाजपने, सत्तेत आल्यानंतर मात्र, आपणही वेगळे नाही हेच दाखवून दिले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त असताना झगडे यांनी औषध विक्रेते तसेच मनमानी करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना सरळ केले होते. औषध विक्रेत्यांकडे बी. फार्म पदवीधारक असणे नियमानुसार बंधनकारक करण्यात आले. दबावाला बळी न पडता झगडे यांनी कारवाई सुरू ठेवल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावरून त्यांची गेल्याच वर्षी उचलबांगडी करण्यात आली होती. परिवहन विभागात त्यांनी अल्पवधीतच आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.
राज्यातील आ.टी.ओ. कार्यालयांमध्ये दलालांना बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मंत्रिमंडळात परिवहन खाते असलेल्या शिवसेनेनेही दलालांची बाजू उचलून धरली होती. दलालांना पैसे देण्याची गरजच काय, असा प्रश्न झगडे यांनी उपस्थित केला होता. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक पट्टय़ातील आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये दलालांची मोठय़ा प्रमाणावर दादागिरी आहे. दलालांकडून  वर्षांला ८०० ते ९०० कोटींचा डल्ला शासकीय तिजोरीवर मारला जातो, असा निष्कर्ष झगडे यांनी काढला होता. मुंबई घरदुरुस्ती मंडळातील रामस्वामी यांच्यापाठोपाठ झगडे या कठोर शिस्तीच्या अधिकाऱ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली करून युतीचे सरकारची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे दाखवून दिले, अशी चर्चा सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीत आहे.
दलालांची चलती – झगडे
आर.टी.ओ. कार्यालयांचा आढावा घेतला असता ज्या प्रमाणात पैसे घेतले जातात त्यावरून वर्षांला ८०० कोटींपेक्षा जास्त पैसे हे दलाल वा अधिकाऱ्यांच्या खिशात जातात, असे आढळून आल्याचे झगडे यांनी सांगितले. म्हणूनच दलालबंदीचा निर्णय अंमलात आणला होता.
पिशवीतील पैसे जप्त
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या सीमेवर आच्छाड या सीमा नाक्यावरून दररोज १० हजारांच्या आसपास अवजड वाहने ये-जा करतात. प्रत्येक वाहनचालकाकडून आर.टी.ओ.चे अधिकारी पैसे घेतात, अशा तक्रारी आल्या होत्या. यामुळेच स्वत: झगडे यांनी दोनच आठवडय़ांपूर्वी ट्रकमधून प्रवास करीत अनुभव घेतला होता. झगडे आल्याचे कळताच अधिकाऱ्यांची धावाधाव झाली आणि या गडबडीत पिशवीतून पैसे नेताना एक जण पडला. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊनच ठाण्याचे मुख्य आर.टी.ओ. जाधव यांना निलंबित करण्याचा आदेश झगडे यांनी दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा