मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडवरील वाहनांचा अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून विशेष मोहीम राबविण्यात आली असून गेल्या सहा दिवसांत विभागाच्या पथकाने वाहनांची तपासणी केली. अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत एकूण ५९६ दोषी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण उपक्रमात, प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य आणि मुंबई पूर्वने नव्याने बांधलेल्या किनारी रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू होती. ही मोहीम १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात आली. आरटीओ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित केले असून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात मुंबई मध्य आरटीओ कार्यालयाद्वारे ३०६ आणि मुंबई पूर्व आरटीओ कार्यालयाद्वारे २९० जणांना पकडले. सर्व वाहनचालकांना किनारी मार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादा पाळण्याचे आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. जनतेत वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढवून सर्वांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आरटीओद्वारे मोहीम राबविण्यात येत आहे.

Story img Loader