अपघातास प्रामुख्याने कारणीभूत असलेल्या मद्यपी चालकांविरुद्ध जोरदार कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आता उलटय़ा दिशेने गाडी चालविणाऱ्यांना थेट तुरुंगवारी घडविण्याचे ठरविले आहे. उलटय़ा दिशेने गाडी चालविल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा होत असतो. तरीही असे प्रकार सुरू असतात. आतापर्यंत पोलिसांकडून त्यांना समज दिली जात होती किंवा दंड आकारला जात होता. परंतु आता भारतीय दंड संहितेच्या २७९, ३३६ कलमानुसार या चालकांना अटक करून त्यांची वाहने जप्त केली जात आहेत. ही मोहीम आधीच सुरू करण्यात आली असली तरी आता बुधवारपासून अधिकच कडक करण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे सहआयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.
आतापर्यंत एक लाख १३ हजार ७४६ मद्यपी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ५४ हजार ८९७ चालकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. यंदाच्या वर्षांत आतापर्यंत दोन हजार ७२४ चालकांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. याच धर्तीवर आता उलटय़ा दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत आतापर्यंत एक हजारहून अधिक चालकांना अटक होऊन त्यांची वाहने जप्त झाली आहेत. त्यापैकी २१६ चालकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. मद्यपी चालकांप्रमाणेच या खटल्यांचाही वाहतूक पोलिसांकडून पाठपुरावा केला जाणार आहे. उलटय़ा दिशेने वाहन चालविणाऱ्यांना आळा बसावा, यासाठी असे गुन्हे करणाऱ्या अधिकाधिक चालकांना तुरुंगवास होईल असे पाहिले जाणार असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

Story img Loader