राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) बसच्या चाकांच्या पुनर्रचनेच्या दृष्टीने (र्रिटेडिंग) ६० कोटी रुपयांच्या रबर खरेदीसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत दुय्यम ठरलेल्या कंपनीला नियम डावलून कंत्राट देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. कंत्राटाच्या निर्णयावर व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षांचे शिक्कामोर्तब होईपर्यंत हंगामी खरेदी सुरू ठेवण्याची तरतूद असल्याने त्याचा आधार घेत फाइल रखडवून ठेवत आतापर्यंत १२ कोटींच्या रबराची खरेदीही उरकण्यात आली आहे.  
बसच्या चाकाचे रबर जुने झाल्यावर त्यावर नवीन रबर चढविले जाते, यास ‘र्रिटेडिंग’ असे म्हणतात. यासाठी एसटीतर्फे मोठय़ा प्रमाणात रबराची खरेदी होते. यावर्षी एसटी महामंडळाने ६० कोटी रुपयांच्या रबराच्या खरेदीसाठी मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली. रबर खरेदीसाठी पुरवठादार निश्चित करण्यासाठी अनेक निकष आहेत. त्यात पुरवठादाराच्या रबराने तयार झालेले चाक सरासरी ३५ हजार किलोमीटर चालले पाहिजे, असा दंडक आहे. पण हे निकष मवाळ करत आतापर्यंतच्या बहुतांश प्रकरणातील सरासरी २६ हजार किलोमीटरच्या आसपास असलेल्या ‘मे. टोलिन टायर्स प्रा. लि.’ या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. याबाबतचा निर्णय त्या वेळी निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले खरेदी व भांडार विभागाचे महाव्यवस्थापक कुमार माने यांनी घेतला.
विशेष म्हणजे, खुद्द माने यांनीच यापूर्वी ‘टोलिन’ कंपनीने पुरवलेल्या रबराच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त करत त्यांचे कंत्राट रद्द केले होते. तसेच महाव्यवस्थापक पदावरील अधिकाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या खरेदीचे अधिकार असताना कुमार माने यांनी हे ६० कोटी रुपयांचे काम दिले. यासाठी निविदा प्रक्रियेतील हंगामी पुरवठय़ाबाबतच्या तरतुदीचा आधार घेण्यात आला व ‘टोलिन’कडून दरमहा चार कोटी रुपयांच्या रबराची खरेदीही सुरू झाली. मात्र माने यांनी निवृत्त होण्याच्या काही दिवस आधीच मंजूर केलेल्या या ‘ट्रेडिंग’बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

र्रिटेडिंग म्हणजे काय?
बसच्या चाकाचे रबर जुने झाल्यावर त्यावर नवीन रबर चढविले जाते, यास ‘र्रिटेडिंग’ असे म्हणतात.