खासगी दंत आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता डावलून आणि नियम धाब्यावर बसवून प्रवेश झाल्याच्या पालकांच्या आरोपावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकरणी पालकांनी केलेल्या तक्रारीत ‘वैद्यकीय शिक्षण विभागा’ने नेमलेल्या विभागीय समित्यांना तथ्य आढळले असून आज  (शुक्रवारी) होणाऱ्या ‘प्रवेश नियंत्रण समिती’च्या बैठकीत याबाबतचा अहवाल मांडण्यात येणार आहे. चौकशी अहवालावरून समितीने दोषींवर कठोर कारवाईचा चाबूक उगारायचे ठरविल्यास काही खासगी महाविद्यालयांची मान्यताही रद्द होऊ शकते.
राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीवरून गेल्या २९ नोव्हेंबरला राज्यातील २६ खासगी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांनी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत केलेल्या सर्व प्रवेशांची चौकशी करण्याचा निर्णय ‘वैद्यकीय शिक्षण विभागा’ने घेतला. पालकांच्या चौकशीच्या आधारे या समित्यांनी चौकशी केली असता त्यात बहुतांश महाविद्यालये दोषी असल्याचे आढळून आले आहे.
..तर आणखी गैरव्यवहार चव्हाटय़ावर आले असते
समितीच्या सदस्यांनी त्या त्या सरकारी महाविद्यालयात महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना व पालकांना बोलावून चौकशी पूर्ण केली आहे. समितीच्या सदस्यांनी खासगी महाविद्यालयात जाऊन त्यांचे रेकॉर्ड तपासले असते तर आता जितके गैरव्यवहार पुढे आले आहेत त्यापेक्षा कितीतरी मोठे गैरप्रकार समितीच्या हाताला लागले असते.