मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा केली असली तरी गेली काही वर्षे केवळ पाच-दहा टक्केच बिलवसुली होत असल्याने बहुतांश कृषीपंपांसाठी सध्या एकप्रकारे मोफतच वीजपुरवठा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या घोषणेचा मोठा राजकीय लाभ मिळण्याची सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना अपेक्षा आहे. मात्र त्यापेक्षा कृषी वीजबिलाची रक्कम राज्य सरकारकडून मिळणार असल्याने महावितरणला अधिक आर्थिक दिलासा मिळणार आहे.

राज्यात सध्या सुमारे ४६ लाखांहून अधिक कृषीपंप असून सरकार ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरविणार आहे. या निर्णयाचा लाभ ४४ लाख सहा हजार शेतकऱ्यांना होईल, असे अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा करताना सांगितले होते. सध्या कृषीग्राहकांना प्रतियुनिट सुमारे दीड रुपयाप्रमाणे बिल पाठविले जाते. वार्षिक सुमारे सहा हजार कोटी रुपयांची बिले पाठविली जातात. त्यापैकी केवळ पाच टक्के म्हणजे २८०-३०० कोटी रुपयांपर्यंतच बिल वसुली होते. काही काळापूर्वी हे प्रमाण आठ-दहा टक्क्यांवर गेले होते, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सध्या एकप्रकारे ९५ टक्के कृषीपंपांच्या बिलांची वसुली होत नाही व मोफतच वीज पुरविली जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling parties leaders expect huge political benefits after free electricity to farmers announce zws
First published on: 01-07-2024 at 03:39 IST