मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून अडचणीत सापडलेल्या महायुतीने मंगळवारी दिवसभरासाठी विधिमंडळाचे कामकाज रोखले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला बगल देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी ही खेळी केल्याचा आरोप विरोधकांकडून यावेळी करण्यात आला.
संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानभवनात आगमन झाले. एकीकडे विरोधकांची मुंडे आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असतानाच फडणवीस यांनी माध्यमांसमोर मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांची खेळी लक्षात येताच सत्ताधारी महायुतीकडूनही आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्याोगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर, महेश लांडगे आदींनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी सांगितले. तीनवेळा कामकाज तहकूब करूनही सत्ताधारी मागणीवर अडून बसल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा टाळण्यासाठीच ही खेळी केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
तपास मुंबई पोलिसांकडेमुंबई
समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्याविरोधातील गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपास मुंबई पोलीस करणार आहेत. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. औरंगजेबाची स्तुती करून हिंदूंच्या भावना दुखावणे, तसेच हिंदू-मुस्लीम धर्मियांमध्ये तेढ निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.