विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना एकेक उद्घाटन महत्त्वाचे ठरत आहे. कुर्ला येथील केवळ ५० खाटांच्या प्रसुतिगृहाच्या उद्घाटनासाठी काँग्रेस आमदाराने थेट मुख्यमंत्र्यांना बोलावत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला बगल दिली. महापालिकेच्याच निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या या प्रसुतीगृहाच्या कार्यक्रमात अखेर पाहुणे म्हणून हजेरी लावण्याची वेळ सेनेवर आली.
कुर्ला येथील बैलबाजार दवाखाना मोडकळीला आला होता. त्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर पालिकेने ५ कोटी ८७ लाख रुपये खर्च करत याठिकाणी प्रसुतीगृह व दवाखाना बांधला. या दवाखान्यासाठी साहित्य मागवण्याच्या निविदाही काढण्यात आल्या असल्या तरी कपाट वगळता इतर सामान घेण्यात आले नव्हते. विधानसभा निवडणुकांपूर्वी या प्रसुतीगृहाचे उद्घाटन करण्याचा शिवसेनेचा विचार होता. मात्र आरोग्य अधिकारी स्तरावर निर्णय घेतले जाऊन रे रोड, भांडूप आणि देवनार येथील रुग्णालयातील जुन्या खाटा, इतर सामान, यंत्र या प्रसुतीगृहात आणली गेली. सत्ताधाऱ्यांना अंधारात ठेवून गुरुवारच्या मध्यरात्री त्यांच्याच नावाने निमंत्रणपत्रिकाही छापल्या गेल्या.
घाईघाईत उद्घाटन झाले तरी किमान १५ दिवस तरी हे प्रसुतीगृह सुरू होऊ शकणार नाही, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. येत्या निवडणुका लक्षात घेऊन स्थानिक आमदार नसीम खान यांनी पालिकेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे, असे सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव म्हणाल्या. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनाला जाण्याचे आदेश दिल्याने पत्रकारांसमोर बाहेर काढलेल्या विरोधाच्या तलवारी मान्य करत पालिकेतील सताधारी पक्षाचे नेते नंतर उद्घाटनाला गेले. दिल्लीत सेनेचा वाघ डरकाळी फोडत असताना, मुंबईत मात्र काँग्रेसपुढे शेपूट घालून बसावे लागले, अशी मार्मिक प्रतिक्रिया सेनेच्याच कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
२४ जुलै रोजी कक्ष अधिकाऱ्यांना पत्र
बैलबाजार येथील प्रसुतीगृहाची जागा पालिकेच्या मालकीची असून पालिकेच्या निधीतून त्याचे नूतनीकरण झाले आहे. मात्र पालिकेच्या स्तरावर या प्रसुतीगृहाच्या उद्घाटनाबाबत निर्णय झालेला नाही. ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती करणारे पत्र २४ जुलै रोजी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मंत्रालयाचे कक्ष अधिकारी आर. एम. परदेशी यांना लिहिले. मात्र हे पत्र उद्घाटनाआधी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची सुतराम शक्यता नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा