मंत्रालयातील अॅनेक्स इमारतीमध्ये आग लागल्याची बातमी सोमवारी दुपारी वाऱयाच्या वेगाने पसरली. मात्र, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यावर आग वगैरे काहीच नसून, दुरुस्तीच्या कामामुळे ठिणग्या उडत असल्याचे स्पष्ट झाले.
अॅनेक्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राजेंद्र गावित यांच्या कार्यालयाशेजारी ठिणग्या दिसल्याने आग लागल्याचे वृत्त पसरले. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे कानोकानी सांगण्यात येऊ लागले. ही माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तिथे त्यांना कोणतीही आपत्कालिन स्थिती नसल्याचे दिसले. मंत्रालयात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरू असताना गावित यांच्या कार्यालयाशेजारी उडालेल्या ठिणग्यांमुळे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याचा गैरसमज निर्माण झाला. त्यानंतर मंत्रालयात शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे वृत्त वेगाने पसरत गेले. मात्र, अग्निशामक दलाच्या पाहणीनंतर मंत्रालयातील सर्व परिस्थिती आलबेल असल्याचे स्पष्ट झाले.