दिनांक – २५ मार्च २०१४ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन, दिनांक – २७ मार्च २०१४ : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचे निधन, दिनांक २८ मार्च २०१४ : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन. चार दिवसांत तीन बडय़ा व्यक्तींचा नावाचा वापर करून व्हॉट्स अ‍ॅपवरून अफवा पसरविल्या जात आहेत. ‘तुमच्या घराजवळ विमान कोसळले आहे. या संदर्भातील माहिती अमूक लिंकवर वाचा’ हा व्हॉट्स अ‍ॅपवरील अफवांचा संदेश जुना होत असतानाच आता बडय़ा व्यक्तींची नावे घेऊन अफवा पसरविण्याचा नवा प्रकार उघडकीस आला आहे.
एखाद्या ग्रूपवर एखादा संदेश पडला की ही अफवा आहे हे समजेपर्यंत त्यावर अनेक गंभीर चर्चा रंगतात आणि त्यानंतर ती निव्वळ अफवा असल्याचे समजते. मग ही अफवा कोण आणि का पसरवितो याचा शोध सुरू होतो. एरवी अशा अफवांकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. पण सलग तीन दिवस पसरविल्या गेलेल्या बडय़ा व्यक्तींसंबंधीच्या अफवांमुळे याची दखल आता पोलिसांनी घेतली असून त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वीही सोशल नेटवर्किंग साइटवरून अशा अफवांचे पेव फुटत असे. पण या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही.
अशा घटनांचा तपास करण्यासाठी जोपर्यंत संबंधित कंपनी मदत करत नाही, तोपर्यंत ते शक्य होत नाही. व्हॉट्स अ‍ॅपवर कोण अफवा पसरवीत आहे, त्याचा मूळ स्रोत काय आहे हे जोपर्यंत व्हॉट्स अ‍ॅपच्या सव्‍‌र्हरचा अभ्यास होत नाही तोपर्यंत समजू शकत नाही. यासाठी भारतीय पोलीस आणि व्हॉट्स अ‍ॅप यांच्यात सामंजस्य करार हवा. तसेच ती कंपनी ज्या देशात आहे, त्या देशाशी गुन्हेगारी माहिती देवाण-घेवाणीचा करार असावा लागतो. या सर्व गोष्टी जोपर्यंत जुळून येत नाही तोपर्यंत नेमका शोध घेणे कठीण जाते. या सर्व गोष्टी वेळखाऊ असल्यामुळे अनेकदा प्रकरणांचा छडा लागण्यास वेळ जातो.
सध्या भारतीय तपास यंत्रणा गुगल अथवा फेसबुकसारख्या कंपन्यांना ई-मेल पाठविल्यावर माहिती मिळवण्यात यशस्वी होतात. या कंपन्यांनाही जगभरातून तक्रारी येत असतात. यासाठी त्यांनी काही प्राधान्यक्रम ठरविले आहेत. त्या प्राधान्यांनुसार ई-मेल्सला उत्तरे मिळत असतात. पण या कंपन्यांवर पूर्णपणे अंकुश ठेवण्याची यंत्रणा नसल्यामुळे तपासाला
वेळ लागत असल्याचे सायबरतज्ज्ञांचे मत आहे.
काय म्हणावे या तंत्रज्ञानाला?
नवीन तंत्रज्ञानाची ही कमाल ऐकून गंमत वाटली. पण मी इतक्यात कुठलीही बातमी देणार नाही. मी २०१५ सालातील कार्यक्रम घेतला आहे! आपल्याबद्दल अशा बातम्या ऐकायला मजा वाटते, पण परवा दीदींबद्दलही अशीच अफवा पसरली होती तेव्हा मन व्याकूळ झाले होते. काय म्हणावे या तंत्रज्ञानाला?                 – बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा