मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी ८ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या वेळात प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाही.

मुंबई विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली होती. त्यानुसार विमानाच्या वेळापत्रकाचे नियोजित वेळापत्रक तयार केले. यातून मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनासह मुंबई विमानतळ प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे करणार आहेत. यात धावपट्टीचे, धावपट्टीच्या बाजूला असलेल्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल यांसारखी प्रमुख कामे या कालावधीत केली जातील.

विमान उड्डाण, आगमनावर परिणाम होणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, सुरक्षा वाढविण्यासाठी आणि विमानाची उड्डाणे आणि आगमने योग्यरित्या होण्यासाठी नियोजित वार्षिक मान्सूनपूर्व देखभाल केली जाणार आहे. या काळात दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहणार आहेत. विमानतळ प्रशासनाने मान्सून पूर्व देखभाल-दुरूस्तीची माहिती विमान कंपन्यांना दिली असल्याने या काळात विमान कंपन्यांनी उड्डाणांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे प्रवाशांवर फारसा परिणाम होणार नाही.

सहा तासांच्या आत देखभाल दुरूस्तीचे काम होणार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १,०३३ एकरावर विस्तारलेले आहे. या विमानतळावरील धावपट्टीची वार्षिक मान्सूनपूर्व देखभाल करणे महत्त्वाचा भाग आहे. विमानतळावरील धावपट्टीची झीज होते. त्याची तपासणी करून, योग्य ती कारवाई करून पावसाळ्यात सुरक्षित उड्डाण आणि लँडिंग केली जाते. तसेच यावेळी पाणी साचण्याची ठिकाणे वेधून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष दिले जाते. संपूर्ण देखभाल प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सहा तासांच्या आत देखभाल-दुरूस्तीची कामे केली जातात.