मुंबईत भाजपा आमदार राम कदम यांच्या उपस्थितीत त्यांच्या मतदारसंघात एका राजस्थानातील कंबलवाले बाबाने अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा केला. यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राजस्थानातील बाबाविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी शुक्रवारी (१५ सप्टेंबर) ट्वीट करत भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “अर्धांगवायूसारखे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबाला आपल्या मतदारसंघात आणून आमदार राम कदम हे शिबिराचे आयोजन करत असल्याचे सोशल मीडियातून समजले. एक बाबा अंगावर घोंगडे टाकून आजार बरा करतो अशा अंधश्रद्धांना लोकप्रतिनिधीकडून पाठिंबा मिळणे दुर्दैवी आहे.”

“गृह विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत”

“अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत,” अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली.

हेही वाचा : VIDEO: अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा; अंनिसची कंबल बाबावर कारवाईची मागणी

अंनिसकडूनही कारवाईची मागणी

दरम्यान, यावर अंनिसने म्हटलं, “कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भोंदू बाबा आमदार राम कदम यांच्या आधाराने त्यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारीही उपस्थित असलेले दिसतात.”

“भोंदू कंबलबाबावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करा”

“गेली १० वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास १००० पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. वर उल्लेख केलेल्या कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा आणि पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी,” अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali chakankar comment on kambal wale baba superstition in mumbai pbs