कमी क्षमतेच्या सभागृहात कार्यक्रम आयोजिण्याचा आग्रह महागात
विद्यार्थीसंख्येपेक्षा कमी क्षमता असलेल्या नव्या कोऱ्या बंदीस्त सभागृहात वार्षिक दिन साजरा करण्याचा आग्रह माटुंग्याच्या ‘डी. जी. रूपारेल महाविद्यालया’ला बुधवारी चांगलाच महागात पडला. सहा हजार विद्यार्थी संख्या असलेल्या रूपारेलच्या वार्षिक दिनाचे आयोजन केवळ ६०० जणांच्या बसण्याची व्यवस्था असलेल्या सभागृहात करण्यात आले होते. परंतु, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यक्रमाला हजेरी लावू इच्छित होते. त्यामुळे, सभागृहात शिरू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीला आवर घालण्यात यश न आल्याने रूपारेलला वार्षिक दिन अखेर रद्द करावा लागला.
दरवर्षी रूपारेलच्या वार्षिक दिनाचे आयोजन संस्थेच्या संकुलातील विस्तृत पटांगणात करण्यात येते. पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम असे या वार्षिक दिनाचे स्वरूप असते. परंतु, या वर्षी प्रथमच प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परंतु, अवघी ६०० जणांची बसण्याची व्यवस्था असलेले हे सभागृह विद्यार्थ्यांची गर्दी सामावण्यात कमी पडू लागले. सायंकाळी ४.३०च्या सुमारास सभागृह गच्च भरल्यानंतर बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंद करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांना बाहेरच पटांगणात ताटकळत उभे राहावे लागल्याने विद्यार्थ्यांनी घोषणा देत नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली. या गोंधळाची कुणकुण लागल्यावर ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे सुधाकर तांबोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत महाविद्यालयात धाव घेतली.
विद्यार्थ्यांमधील संताप पाहून त्यांनी महाविद्यालयाला कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती केली. कार्यक्रम तसाच सुरू ठेवण्यात आला असता तर विद्यार्थ्यांमध्ये एकतर चेंगराचेंगरी तरी झाली असती किंवा त्यांनी इतर हिंसक मार्गाने आपली नाराजी व्यक्त केली असती, अशी प्रतिक्रिया तांबोळी यांनी व्यक्त केली. वर्षांनुवर्षे महाविद्यालयाचा वार्षिक दिन पटांगणात साजरा होत आला आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना व्यवस्थित बसून कार्यक्रमाचा आनंद घेता येतो. पटांगणात कार्यक्रम सुरळीतपणे होत असताना संस्थेच्या बंदीस्त आणि मर्यादीत बैठक व्यवस्था असलेल्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला. आता जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात वार्षिक दिनाने आयोजन केले जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा