लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीची लगबग सुरू आहे. ८ ऑक्टोबरला मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करतानाच दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आदी ठिकाणच्या अंदाजे साडेसहा हजार घरांसाठीची जाहिरात आचारसंहितेआधी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कोकण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

१० ऑक्टोबरच्या आत साडेसहा हजार घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. लवकरच सोडतीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी घेत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. दरम्यान, या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील घरांची संख्या सर्वाधिक असणार असून २० टक्क्यांसह म्हाडा गृहनिर्माण योजनेतील काही घरांचाही समावेश असणार आहे.

आणखी वाचा-जिल्हा रुग्णालयांमध्ये होणार ह्रदयविकारातील रक्तवाहिन्यातील गाठ विरघळविणारा उपचार

साडेसहा हजार घरांच्या सोडतीत सर्वाधिक अंदाजे ५ हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील असणार आहेत. खोणी, शिरढोण, भंडार्ली, गोठेघर आदी ठिकाणची ही घरे असून ही सर्व घरे अत्यल्प गटातील असणार आहेत. त्याच वेळेस ठाण्यातील विविध ठिकाणची २० टक्के योजनेतील ५९२ घरेही सोडतीत समाविष्ट असणार आहेत.

वीस ते पंचवीस लाख किंमत

महत्त्वाची म्हणजे कोकण मंडळाची सोडत अत्यल्प आणि अल्प गटासाठीच असणार आहे. तर या घरांच्या किमती २० ते २५ लाखांच्या घरात असणार आहेत. दरम्यान, आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करून निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

आणखी वाचा-मुंबईतील बंदोबस्तात वाढ, धार्मिक स्थळांवर करडी नजर

पुणे मंडळाची डिसेंबरमध्ये सोडत?

म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया राबवून डिसेंबरमध्ये सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

प्रथम प्राधान्य योजनेतील घरे

  • ताथवडे, म्हाळुंगे येथील म्हाडाच्या विकल्या न जाणाऱ्या घरांचा सोडतीत समावेश असणार आहे.
  • म्हाळुंगेमधील १,३००, ताथवडेमधील ४१८ घरे प्रथम प्राधान्य योजनेतील असतील. तर २० टक्के योजनेतील सदनिकांची संख्या २,५०० ते ३,००० च्या आसपास असण्याची शक्यता आहे.
  • पंतप्रधान आवास योजनेतील ३२० घरे कागलमधील असून तळेगावमधील पीएमएवाय योजनेतील १५० घरे समाविष्ट असतील. सोलापूरकरांसाठी १७० घरे तर संत तुकाराम नगरमधील ३२ आणि सासवडमधील ७९ घरांचाही सोडतीत समावेश असणार आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rush to advertise houses before code of conduct flats at 11 thousand in west maharashtra and konkan from mhada mumbai print news mrj