रस्ता रुंदीकरणात घर गेले, पण पुनर्वसनाची प्रतीक्षा संपत नव्हती. म्हातारी आई आणि पाच कच्च्याबच्च्यांसह पदपथावरच राहणाऱ्या कांताबाईवर शुक्रवारी काळाने झडप घातली. अठराविश्वे दारिद्रय़ात जीवन जगलेल्या कांताबाईच्या मृत्यूला बेस्टचा गंजलेला वीजेचा खांब कारणीभूत ठरला. पण पालिका अथवा बेस्टचा एकही अधिकारी साधी विचारपुस करण्यासाठी तेथे फिरकलाही नाही.
दुष्काळ पडल्याने जालन्यात एकवेळ खाण्याचीही भ्रांत होती. त्यामुळे घरादाराचा त्याग करुन अनेक कुटुंबांनी मुंबईचा रस्ता धरला. दुष्काळाचे सावट दूर होताच काही कुटुंबे जालन्याला परत गेली. पण छोटे-मोठे काम करुन आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटणारे शंकर वाघमारे पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसह मुंबईतच राहिले. दादरच्या फुलगल्लीत पदपथावरच छोटय़ाशा झोपडीत त्यांनी आपला संसार थाटला.
फुलविक्रीचा व्यवसाय करणारे शंकर वाघमारे यांचे कालौघात निधन झाले. दरम्यानच्या काळात वाघमारे यांची मोठी कन्या कांताबाईचा जनार्दन पाटोळे याच्याशी विवाह झाला. परंतु काही वर्षांनी त्यांचा काडीमोडही झाला आणि कांताबाई आपल्या पाच मुलांसह पुन्हा फुलगल्लीत आईकडे राहायला आली. कच्च्याबच्च्यांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न तिला भेडसावत होता. आईसोबत राहत असतानाही तिच्यामागचे शुक्लकाष्ट सुरूच होते.
सेनापती बापट मार्गावर उड्डाणपूल बांधताना रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रस्त्यालगत असलेल्या झोपडपट्टय़ा पालिकेने जमीनदोस्त केल्या. पालिकेने काही कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र वाघमारे यांच्यासह अनेक कुटुंबाचे आजतागायत पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
आसरा नसल्याने मुळ झोपडीच्या जागेवरच प्लास्टिकच्या कापडाने आसरा उभारुन कांताबाई दिवस कंठत होती. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू असताना आई आणि मुलांबरोबर झोपडीतच ती गप्पा मारत बसली होती. त्याचवेळी पुलावरील बेस्टचा गंजलेला वीजेचा खांब कोसळला आणि कांताबाईवर काळाने झडप घातली. कपाळमोक्ष झालेल्या कांताबाईला नागरिकांनी तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्यावर वर्मी मार लागल्याने तासाभरातच त्यांचे निधन झाले. कांताबाईची म्हातारी आई आणि पाच मुलांवर आभाळच कोसळले.
ही दुर्घटना घडल्यानंतर तेथे ना पालिकेचा अधिकारी फिरकला ना बेस्टचा. पोलिसांनी शनिवारी पंचनामा उरकला आणि त्यानंतर केईएमने कांताबाईच्या पार्थिवाचे शवविच्छेदन हाती घेतले.
सायंकाळी उशीरा तिचे पार्थिव फुलगल्लीत आणण्यात आले. त्यावेळी तिच्या कच्च्याबच्च्यांनी हंबरडा फोडला आणि फुलगल्लीतील दु:खाची छाया अधिकच गडद झाली.