अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अशातच त्या स्वतः शिंदे गटात जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. याबाबत पत्रकारांनी ऋतुजा लटकेंनाच विचारलं. यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली. त्या बुधवारी (१२ ऑक्टोबर) मुंबई महानगरपालिका कार्यालयात पत्रकारांशी बोलत होत्या.
ऋतुजा लटके म्हणाल्या, “तुम्ही माझ्याकडे बघितल्यावर माझ्यावर दबाव आहे असं तुम्हाला वाटतं का? माझ्यावर शिंदे गटाचा दबाव नाही. मला शिंदे गटाकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची माहिती खोटी आहे. मी त्यांना भेटलेले नाही.”
“आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी आहे”
“आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. माझे पती रमेश लटके त्यांचीही निष्ठा उद्धव ठाकरेंशी आणि बाळासाहेब ठाकरेंशीच होती,” असं ऋतुजा लटकेंनी स्पष्ट केलं.
“आजच्या आज माझा राजीनामा मंजूर करावा”
पालिकेतील नोकरीच्या राजीनाम्यावर बोलताना ऋतुजा लटके म्हणाले, “मी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तांना भेटून आजच्या आज माझा राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी करणार आहे. मला सोमवारीच जीएडी कार्यालयाकडून चलन देण्यात आलं. त्याचं पेमेंट मी केलं आहे. सोमवारपासून आज तिसरा दिवस आहे, मी जीएडी कार्यालयात येऊन बसत आहे.”
“मला सांगण्यात आलं की, सर्व तयार आहे केवळ तुमच्या सहीमुळे तुमचा राजीनामा मंजूर करणं बाकी आहे. माझ्या राजीनाम्यात काय तांत्रिक अडचण आहे हे मला माहिती नाही. मला आयुक्तांना भेटल्यावरच याबाबत माहिती समजेन. त्यानंतर मी याबाबत भाष्य करेन,” असंही लटकेंनी नमूद केलं.