मुंबई : उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिल्यावर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्या शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शुक्रवारी सकाळी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या जागेवर भाजप की ‘बाळासाहेबांची शिवसेना’ लढणार, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दोघांपैकी कोण लढणार, यासंदर्भात संभ्रम कायम असला तरी मुरजी पटेलच लढण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र महापालिकेकडून शुक्रवारी सकाळी मिळाल्यावर त्यांच्याबरोबर शेकडो शिवसेना कार्यकर्ते जातील आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे ज्येष्ठ शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सांगितले. एखाद्या आमदाराचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणी पोटनिवडणूक लढविली, तर ती बिनविरोध झाली आहे. महाराष्ट्राची वेगळी राजकीय संस्कृती असल्याने अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन आम्ही याआधीच केले आहे. पण सध्याचे राजकारण चांगले चाललेले नसून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा परब यांनी व्यक्त केली.

युतीमध्ये शेवटपर्यंत अनिश्चितता

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असला तरी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने आपला उमेदवार अधिकृतपणे घोषित केला नव्हता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उमेदवार मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांची भेट घेऊन चर्चा केली. ही जागा शिवसेनेची असल्याने ती शिंदे गटास मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. पण ऋतुजा लटके यांच्याबरोबर लढत देता येईल, असा तुल्यबळ उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यासाठीच शिंदे गटाने लटके यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला. शिंदे यांनी मुरजी पटेल यांनाही बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्याचा पर्याय सुचविला. पण या मतदारसंघात भाजपच्या निवडणूक चिन्हावरच लढल्यास जिंकता येईल, असे मत त्यांनी शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. शिंदे गटाकडून उमेदवाराची चाचपणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पटेल हे भाजपच्या चिन्हावर लढल्यास शिंदे गटास निवडणूक लढवायची नसताना निवडणूक आयोगाकडे अर्ज करून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह व पक्षनाव गोठविले, अशी टीका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पटेलच ही निवडणूक लढण्याची चिन्हे असून त्यांना भाजपच्या चिन्हावर लढवायचे की शिंदे गटाच्या याबाबत रात्री उशिरापर्यंत ज्येष्ठ नेत्यांमध्ये आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी विचारविनिमय सुरू होता.

मला न्याय मिळाला : लटके

न्यायदेवतेवर विश्वास होता. अखेर मला न्याय मिळाला. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. निवडणूक चिन्ह नवे असले, तरी माणसे जुनी आहेत आणि मला रमेश लटकेंचा आशीर्वाद आहे, असे ऋतुजा लटके यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rutuja latke application thackeray sena today shinde group fight andheri east bjp named murji patel ysh