मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप अ‍ॅड. अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. लटके यांच्या राजीनाम्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने त्यांची उमेदवारी अधांतरी आहे. त्यामुळे ठाकरे गटाने पर्यायी उमेदवार देण्याची तयारी केली असून दोन-तीन नेत्यांना उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मी शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे लटके यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नियमांनुसार महापालिकेकडे राजीनामा दिला असून त्या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असल्याने त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते. पण पालिका आयुक्तांवर सरकारचा दबाव असल्याने लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याचा आरोप परब यांनी केला.

ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी आपल्या लिपीक पदाचा राजीनामा दिला. पण त्यात स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी, असा उल्लेख व अटी होत्या. हा राजीनामा नियमानुसार नसल्याचे सांगितल्याने पुन्हा राजीनामा पत्र देण्यात आले. महापालिका सेवा शर्ती नियमांनुसार एक महिन्याची नोटीस देणे बंधनकारक असून ती न दिल्यास एक महिन्याचा पगार पालिका कोषागारात जमा करावा लागतो. त्यानुसार लटके यांनी एक महिन्याच्या पगाराची रक्कम जमा केली आहे. त्यांचा आधीचा राजीनामा चुकीच्या पध्दतीने दिला होता, तर वेळीच सांगण्यात का आले नाही, असा सवाल परब यांनी केला. ऋतुजा लटके म्हणाल्या, मी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतलेली नाही. आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बरोबर आणि शिवसेनेबरोबर एकनिष्ठ आहोत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rutuja latke candidature technical issues alleged municipal commissioner not approve resignation ysh